पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह)

 

गेल्या सात-आठ वर्षांमध्ये देशांमध्ये नवीन उद्योग सुरू करण्यामध्ये स्टार्टअप कंपन्यांचा फार मोठा वाटा आहे. या स्टार्टअप कंपन्या म्हणजे एखाद्या तरुणाला सुचलेली एखादी नाविन्यपूर्ण सेवा किंवा एखाद्या उत्पादन तयार करणारी कंपनी होय. एक प्रकारे बाजारपेठेमध्ये एखादे नवीन उत्पादन सादर करणे किंवा एखादी आगळीवेगळी सेवा लोकांना प्रथमच देऊन त्यांची बऱ्याच काळाची गरज भागवणे याला स्टार्ट अप कंपनी सुरू करणे असे म्हणतात.अनेक वेळा या स्टार्टअप कंपन्या उच्च तंत्रज्ञान असणाऱ्या असतात व त्यातून ते काहीतरी नाविन्यपूर्ण उत्पादन बाजारपेठेत सादर करतात. काही वेळा एखादे जुने उत्पादन पण नाविन्यपूर्ण पद्धतीने बाजारात आणून सादर करण्यासाठी सुद्धा स्टार्टअप कंपन्या काम करतात असे आढळले आहे.गेल्या काही दिवसात असे लक्षात आले आहे की काही स्टार्ट अप कंपन्यांना विक्रीसाठी कोणतेही उत्पादन नसते किंवा उत्पन्नाचे काही साधनही असत नाही. परंतु त्यास स्टार्टअप कंपनी असे म्हणता येते. खरे तर याबाबत कोणतेही नियम वगैरे असे केलेले कुठे दिसत नाहीत.मात्र अशा एखाद्या स्टार्टअप कंपनीमध्ये जर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली तर त्याचे रूपांतर एखाद्या पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये किंवा मोठ्या कॉर्पोरेशन मध्ये होऊ शकते.

कोणत्याही स्टार्टअप कंपनीचा जो संस्थापक असतो त्याच्या डोक्यात काहीतरी नाविन्यपूर्ण कल्पना आकार घेत असते. वेगळे तंत्रज्ञान वापरून तो एक उत्पादन तयार करतो आणि अखेर कोणाच्यातरी गुंतवणुकीचे मोठे सहाय्य घेऊन त्याचे रूपांतर मोठ्या कंपन्यांमध्ये होते. जगातील अनेक देशांमध्ये गेल्या दशकामध्ये हजारो स्टार्ट अप सुरू करण्यात आले. ज्या स्टार्टअप कंपन्यांचे मूल्य एक बिलियन डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त असते तेव्हा अशा कंपनीला “युनिकॉर्न” असे संबोधण्यात येते.अनेक वेळा हे तंत्रज्ञ स्वतःचे थोडेफार भांडवल घालून किंवा कोठून तरी कर्ज उभे करून स्टार्टअप कंपन्या सुरू करतात. अनेक वेळा प्रारंभी जे उत्पादन चांगले आकर्षक वाटते त्याचे रूपांतर व्यापारी उत्पादनामध्ये होऊ शकत नाही. अशावेळी गुंतवणूकदाराला मोठा फटका बसू शकतो. मात्र काही स्टार्टअप कंपन्या अत्यंत यशस्वी झालेल्या कंपनीलाही नावीन्यपूर्ण उत्पादनामुळे गाळात घालू शकतात. अशा स्टार्ट अप प्रयोगांना वेंचर कॅपिटॅलिस्ट असेही म्हणतात.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात जानेवारी२०१६ मध्ये स्टार्टअप इंडिया मिशनचा प्रारंभ झाला. पहिल्या वर्षात भारतात 452 स्टार्ट अप कंपन्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या मिशनला अबूतपूर्व यश लाभले. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातभारतात तब्बल ८४ हजार १२ स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या. .या कंपन्यांची वर्गवारी पाहिली तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात 12 टक्के कंपन्या होत्या तर आरोग्य सेवा आणि लाईफ सायन्स क्षेत्रात नऊ टक्के कंपन्या सुरू झाल्या. शिक्षण क्षेत्रातही साधारणपणे ७टक्के कंपन्या होत्या व्यावसायिक व सेवा क्षेत्रामध्ये पाच टक्के कंपन्या स्थापन झाल्या. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे देशाच्या महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या कृषी क्षेत्रामध्ये पाच टक्के स्टार्ट अप कंपन्यांचा प्रारंभ झालेला होता.

 

गेल्या काही वर्षात भारतात स्थापन झालेल्या स्टार्टअप कंपन्यांमुळे जागतिक पातळीवर आपण तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप निर्माते बनलो आहोत. देशाच्याढोबळ राष्ट्रीय उत्पादनात त्याचा जवळ जवळ पाच टक्के इतका वाटा आहे. ही खरोखरच आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. स्टार्ट अप कंपन्यांमध्ये रोजगार निर्मिती होत नाही असा एक गैरसमज आहे. गेल्या काही वर्षात या स्टार्टअप साडेसात लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.पुढील पाच वर्षात दरवर्षी किमान 25 टक्के वाढ या स्टार्टअप कंपन्यांमध्ये होईल असा अंदाज आहे.केंद्र सरकारने या स्टार्टअप कंपन्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी स्टार्ट अप इंडिया सीड फंड स्कीम सुरू केले असून त्यांना पतधोरणाचेही पाठबळ दिलेले आहे.

 

या स्टार्टअप कंपन्यांचा आढावा घेतला तर त्यात संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने मोठी आघाडी घेतलेली आहे. मुळातच एकूण स्टार्टअप कंपन्यांपैकी ५८ टक्के कंपन्या .महाराष्ट्र, ,कर्नाटक, ,दिल्ली ,गुजरात व उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये आहेत. आज मितीला महाराष्ट्रात १५ हजार ५७१ स्टार्टअप कंपन्या आहेत. त्या खालोखाल कर्नाटकात ९,९०४ तर दिल्लीमध्ये ९,५८८ स्टार्ट अप कंपन्या आहेत.केंद्र सरकारने या स्टार्टअप कंपन्या सुरू करण्यासाठी प्रारंभी दहा हजार कोटी रुपयांचा निधी निर्माण केला आहे. यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला नावीन्यपूर्ण कल्पना सुचली तर त्याने त्याच्या कल्पनेचे एक प्रुफ तसेच त्या उत्पादनाचा एखादा म्हणजे नमुना किंवा त्याच्या काही केलेल्या ट्रायल्स यासाठी सुद्धा आणि त्या बाजारात आणण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी त्याला यातून आर्थिक सहाय्य दिले जाऊ शकते. खऱ्या अर्थाने नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक मदतीचा हात देऊन त्याला बाजारात यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाने क्षणी आघाडी घेऊन देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य स्टार्ट अपच्या क्षेत्रात निर्माण केले आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राने या स्टार्टर द्वारे आत्तापर्यंत १ लाख ४६ हजार १३२ इतका रोजगार निर्माण केला आहे. केंद्र सरकारने या स्टार्टअप ला मान्यता देण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड ( डीपीआयआयटी)असा विभाग निर्माण केला आहे. त्यावर देशातील सर्व स्टार्टअपना सर्वतोपरी सहाय्य करणे व त्याच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान नवीन उत्पादन किंवा नवीन प्रक्रिया बाजारात सादर करण्यासाठी हातभार लावला आहे. तंत्रज्ञानातील सतत होणारे बदल व त्यामध्ये तरुणांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन नवनवीन उत्पादने किंवा सेवा निर्माण करण्यासाठी या स्टार्टअप च्या माध्यमातून आगामी पाच वर्षात लाखो रोजगार निर्माण करण्याचे महत्वकांक्षी पाऊल मोदी सरकारने निश्चित टाकलेले आहे त्याबद्दल त्यांचे खरोखर अभिनंदन केले पाहिजे.

 

->  श्री नंदकुमार काकिर्डे

 

( लेखक पुणे स्थित जेष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत).

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *