थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे मोठ्याप्रमाणात फोफावले असून अलिकडे हा एक समाजाचा अविभाज्य घटक आहे की काय हाच प्रश्न सर्वसामान्यांवर पडला आहे. कारण यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कुचकामी ठरवताना दिसत आहे.
लोणी काळभोर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बहुतेक सर्वच भागात अवैध धंद्याला सुगीचे दिवस आले आहेत. अवैध धंदे विनादिक्कतपणे चालू आहेत.मटका धंद्याबरोबरच यासी संबंधित अन्य धंदे चिमणी पाखरं, तीनपत्ती यासारखी जुगारातील प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत,तर लाॅजिंगच्या नावाखाली वेश्याव्यवसाय जोरात चालू आहे.अशा धंद्यावर जुजबी कारवाई झाल्यानंतर तो लगेचच पुन्हा दुप्पट जोमाने चालू होतो, केवळ वरवरची कारवाई करण्यात येते यामुळे तरुण पिढी या वाईट प्रवृत्तीच्या आहारी जात आहे.
या पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पाचही बिटात मटक्याचे कुरण आहे सारे दिसत असताना देखील कारवाई का होत नाही हा यक्ष प्रश्न आहे.याचा परिणाम सामाजिक स्वास्थ्यावर होत असून तरुण पिढी वाम मार्गाला लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अवैध दारुविक्रीने तर परिसिमाच ओलांडली आहे.अनेक हाॅटेल्स मिनी बियरबार झाले आहेत. येथे सर्रासपणे दारु विकली जात आहे.याचा परिणाम अल्पवयीन मुले या व्यसनाच्या आहारी जात असून त्यांच्यात भांडण करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे.शाळेत जाणारी मुले सुध्दा हातात कोयते घेऊन भांडण करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना भविष्यात जगणे अवघड होऊन बसणार आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे का दुर्लक्ष केले याबद्दल सर्वसामान्य नागरिकांत मोठा प्रश्न आहे. गुन्हा घडल्यानंतर त्यावर कारवाई करण्यापेक्षा त्याचे मूळ शोधून त्यावर प्रतिबंध होणे आवश्यक आहे.
तसेच प्रतिबंधित गुटखा तर सर्रास सर्वत्र उपलब्ध आहेच फक्त कागदोपत्रीच यावर बंदी पण कारवाई कोण करत नाही यात राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन याचीही कुचकामी कामगिरी या सर्वास जबाबदार आहेच.
