पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) श्रावण आणि भाद्रपद हे दोन महिने गृहिणींसाठी अतिशय आनंदाचे असतात. श्रावणात रक्षाबंधन, पोळा, हरतालिका असे सण येतात तर पाठोपाठ येणारा भाद्रपद महिना गणेशाला घेऊन येऊन येतो. प्रतिवर्षी या गणेशापाठोपाठ ज्येष्ठा गौरींचेही आगमन होते. आणि अवघे घर या गौरी गणपतीच्या मंगल आगमनाने हर्षभरित होऊन जाते. ज्येष्ठा गौरी हा महिलांचा अतिशय आवडता सण. या दिवशी गौरी माहेरी येतात. गौरी म्हणजेच पार्वती. गौरी म्हणजेच साक्षात महालक्ष्मीचे रूप. गणेशापाठोपाठ येणारी गौरी म्हणजे गणेशाची आई पार्वती. कोणी त्यांना गणपतीची बहिण तर कोणी गणपतीची पत्नीही म्हणत्तात. पण नाते काहीही असले तरी गौरी म्हणजे माहेरवाशीण या गोष्टीबद्दल सगळ्यांचेच एकमत असते.

गृहिणी वर्षभर या सणाची वाट पहात असतात. आजकाल धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात पूर्वीसारखे सर्व व्रतवैकल्ये करणे कठीण आहे. शिवाय कुटुंबे लहान झाली आहेत. घरातील सदस्य आता नोकरीनिमित्त वेगवेगळे राहत असले तरी या सणासाठी सगळे कुटुंबीय एकत्र येतात. कारण ‘ गौराई माझी लाडाची..’ हे नक्कीच. म्हणून घरातील स्त्रिया किमान महिन्याभरापासून या सणाची तयारी करीत असतात. प्रत्येक कुटुंबात या महालक्ष्मीच्या परंपरा वेगळ्या आहेत. पण त्यामागील श्रद्धा, आदरभाव आणि उद्देश सारखाच. प्रेम सारखेच. जवळपास सर्वच समाजात ज्येष्ठा गौरीचे पूजन वेगवेगळ्या स्वरुपात केले जाते. काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. मुखवटे मातीचे, शाडूचे किंवा पितळी असतात. तर काही लोकांकडे नदीतील पाच किंवा सात खडे आणून त्यांचे पूजन केले जाते. काही ठिकाणी तेरड्याची किंवा तुळशीच्या झाडाची गौरी म्हणून पूजा केली जाते. काही ठिकाणी धान्याच्या राशीवर मुखवटे ठेवून त्यांचे पूजन केले जाते. शेतकऱ्यांच्या घरात आलेले धान्य हे त्यांची लक्ष्मीच असते.

अनुराधा नक्षत्रावर या गौरींचे आगमन होते किंवा त्यांना आवाहन केले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर त्यांचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन केले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन होते म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी असे म्हणतात. अर्थात गौरीचे आगमन होताना ती एकटी येत नाही, तर तिच्याबरोबर तिची सखी असते. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा असे म्हणतात. गौरीला घरात आणताना घरातील दुसरी सुवासिनी किंवा कुमारिका त्या गौरी आणणाऱ्या स्त्रीच्या पायावर दूध पाणी घालतात. अक्षता टाकून त्यांना ओवाळले जाते. त्यांची प्रतिस्थापना करण्यापूर्वी त्यांना सर्व घरभर फिरवून आणले जाते. म्हणजेच घर दाखवले जाते. गौरीची म्हणजेच पर्यायाने लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या घरावर राहावी हा त्यामागील उद्देश असतो. गौरी सोन्याच्या पावलांनी येतात म्हणजेच समृद्धी घेऊन येतात.

लोणी-काळभोर येथील फलटणकर कुटुबियांनी देशाचा 75 वा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आपल्या देशाने क्रिडा क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीचा देखावा साकारला आहे.

पुणे शहरात रोजगार आणि व्यवसाय यासाठी स्थलांतरित झालेल्या असंख्य कुटूंबे हा सण या भागात घेऊन आले.

आज गौरींना महा नैवेद्य अर्पण केला जातो तर उद्या विसर्जन केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *