राजगुरूनगर (हवेलीनामा ऑनलाईन)  येथील खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांचा अर्ज बाद झाला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
                खेड पंचायत समितीच्या  सभागृहात झालेल्या निवड प्रक्रिया पार पडली यावेळी  सभापतीपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. या निवडीमुळे २४ मे पासून राजकीय अज्ञातवासात असलेल्या सर्वपक्षीय सदस्यांचा अज्ञातवास अखेर शंभर दिवसांनी संपला. स्पष्ट बहुमत असतानाही आणि राज्यातील वरीष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्याने मोठी चर्चा झाल्यानंतरही शिवसेनेला मात्र सत्ता गमवावी लागली. खेडमध्ये या निवडणूकीने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने याचे पडसाद भविष्यात पुढील निवडणुकांत पडणार असल्याचे सिद्ध झाले.
          सभापती निवडीनंतर आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते अरुण चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, प्रभारी सभापती चांगदेव शिवेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, माजी सभापती रामदास ठाकूर, राष्ट्रवादी पदाधिकारी कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे, अरुण चांभारे, मयूर मोहिते, उमेश गाडे, सुभाष होले, हेमलता टाकळकर यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार मोहिते म्हणाले की, भगवान पोखरकर हे सभापती होण्यासाठी माझ्या विनवण्या केल्या, त्यांनी नंतर विश्वासघात केला. त्यांच्यावर अनेक फौजदारी गुन्हे दाखल असून ते शिक्षा भोगत आहेत , शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव  आढळराव पाटील यांच्यावरही त्यांनी  टीका केली. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका पुढे ढकलल्याने यापुढे अधिक लोकांना पदाधिकारी होण्याची संधी मिळेल, असे आमदार दिलीप मोहिते यांनी नमूद केले.
      या निवडणुकीसाठी पंचायत समितीच्या परीसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ५०० मीटर परिघात वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची खूप पायपीट झाली. मंगळवारी पंचायत समिती वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र प्रवेश बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *