थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे सोलापूर महामार्गावर बोरकरवस्ती ओढ्यानजीक असलेल्या विद्युत रोहित्रास एक मालमोटार धडकली सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु विज वितरण महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या भागातील विज पुरवठा खंडीत झाला आहे.
थेऊर येथील वितरण महामंडळाचे सहाय्यक अभियंता सुरेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी पहाटे एक टरबुजांनी भरलेली मालमोटार पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्याच्या दिशेने जात असताना चालकास बोरकर वस्ती येथील ओढ्या नजीक आल्यानंतर ओढ्या शेजारील रस्त्यात त्याची गाडी अचानक शिरली व गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले त्यामुळे ती मालमोटार सरळ ओढ्यात उभे करण्यात आलेल्या रोहित्रा वर जाऊन आदळली त्यामुळे ते रोहीत्र तुटून खाली जमिनीवर पडले सुदैवाने वीज प्रवाह वेळेतच खंडित झाल्याने माल मोटारीच्या चालकास कसलीही हानी झाली नाही परंतु या दुर्घटनेत महामंडळास लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.या धक्क्यामुळे साधारण तीन ते चार खांब तुटले असल्याने आजूबाजूचा वीज पुरवठा खंडित झाला आहे याच वाहिनीवरून पुढे उरळीकांचन व यवत पर्यंत पुरवठा केला जात असल्याने तोही वीज पुरवठा खंडित झाल्याने हे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन तो वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी उरुळी कांचन उपविभागाचे सहाय्यक अभियंता संजय पोफळे या कामावर लक्ष ठेवून होते.
यावर लोणी काळभोर पोलिसात रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
