जगदीश  काशिकर
चंद्रपूर (हवेलीनामा ऑनलाईन) चंद्रपूर जिल्ह्य़ातील ऊर्जानगर, दुर्गापूर परिसरात वाघांचा व अन्‍य वन्‍यप्राण्‍यांचा वावर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्‍याचाच परिणाम म्‍हणून गेल्‍या दोन दिवसात त्‍या परिसरात वाघाने दोघांचा बळी घेतला ज्‍यामध्‍ये एका १६ वर्षाच्‍या मुलाचा समावेश आहे. या घटना अतिशय दुर्देवी असून वनविभागाने ऊर्जानगर परिसर तात्‍काळ नो टायगर झोन घोषीत करावा व त्‍या परिसरातील वाघांना पकडून त्‍यांचे दुसरीकडे पुनर्वसन करावे असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
           या विषयावर जिल्‍हाधिकारी कार्यालयात एका महत्‍वाच्‍या बैठकीचे आयोजन मुनगंटीवार यांनी केले. या बैठकीला  जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने, मुख्‍य वनसंरक्षक एन. प्रविण, वनसंरक्षक रामगांवकर, वनविकास महामंडळाचे प्रमुख अनारसे, चंद्रपूर महाऔष्‍णीक विद्युत केंद्राचे मुख्‍य अभियंता पंकज सपाटे, वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे अधिकारी, भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्‍हा परिषद महिला बालकल्‍याण समिती सभापती रोशनी खान, जिल्‍हा परिषद सदस्‍या वनिता आसुटकर, भाजपा तालुकाध्‍यक्ष हनुमान काकडे, नामदेव आसुटकर, विलास टेंभुर्णे, पंचायत समिती सभापती केमा रायपुरे व अन्‍य पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार मुनगंटीवार यांनी या विषयाला सर्वसंबंधित विभागांनी अतिशय गांभीर्याने घेण्‍याचे निर्देश अधिका-यांना दिले. चंद्रपूर महाऔष्‍णीक विद्युत केंद्राने वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यापासून वाचण्‍यासाठी सिसी टिव्‍ही कॅमेरे व सेंसर सिस्‍टीम बसवावी तसेच आजुबाजूला वाढलेली झुडपे काढण्‍याचे काम तातडीने सुरू करावे असेही सांगीतले. सध्‍या असणा-या भितीमुळे विद्युत केंद्राच्‍या प्रमुख गेटपासून आतपर्यंत जाण्‍यासाठी बसची व्‍यवस्‍था करावी असे निर्देश दिले. या कामात भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी संबंधित विभागांना मदत करावी.
       मध्‍यप्रदेशच्‍या धर्तीवर इंटलीजंट कॅमेरा टेक्‍नॉलॉजी याचा अभ्‍यास करून असे कॅमेरे ताबडतोब लावावे. या कॅमे-यांमध्‍ये अशी व्‍यवस्‍था आहे की त्‍या कॅमे-याजवळ कुठलाही वन्‍यप्राणी आला तर त्‍याचा एसएमएस संबंधित आरएफओला जाईल व तिथे सायरन वाजण्‍यास सुरूवात होईल. ज्‍यामुळे त्‍या प्राण्‍याची येण्‍याची सुचना वनविभागाला व आसपासच्‍या नागरिकांना मिळेल. या सिस्‍टीमचा प्रस्‍ताव ताबडतोब वनविभागाला पाठवावा तसेच यासंबंधात केंद्र सरकारच्‍या आयटी विभागाला पत्र पाठवून इंटलीजंट कॅमेरा टेक्‍नॉलॉजी यासंबंधात अद्ययावत माहिती मागवावी अशा सूचना केल्या. . याप्रसंगी मा. जिल्‍हाधिकारी यांनी सुध्‍दा सर्व अधिका-यांना या विषयावर तातडीने कारवाई करण्‍याचे निर्देश दिले. आ. मुनगंटीवार यांनी मा. मुख्‍यमंत्री उध्‍दवजी ठाकरे, वन राज्‍यमंत्री ना. दत्‍तात्रयजी भरणे, मुख्‍यमंत्र्यांचे सचिव मा. विकास खारगे या सर्वांशी बोलण्‍याचे आश्‍वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *