जगदीश का. काशिकर,
पनवेल (हवेलीनामा ऑनलाइन) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्मा हिरवे गुरूजी, लोकनेते, माजी खा. दि. बा. पाटील यांच्या लढवय्या कर्मभूमीत प्रथमच उद्या, शनिवारी (ता.22) राज्यव्यापी साहित्य संमेलन होत आहे. राज्यासह साता समुद्रापार साहित्यातून विचारांचा अटकेपार झेंडा रोवणारे दिग्गज साहित्यिक त्यानिमित्ताने प्रथमच पनवेलमध्ये येत आहेत. साहित्यिकांच्या स्वागतासाठी अवघ्या पनवेल नगरीची उत्सुकता शिगेला पोहचली आहेच. शिवाय स्थानिक वारकरी सांप्रदायाच्या धुरिणींनी ही साहित्य दिंडी यशस्वी करण्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतल्याने संत ज्ञानोबा, तुकोबा, जनाईच्या वारसांसह साक्षात वैकुंठीचा राणा, विठ्ठलच दिंडीत फेर धरणार असल्याची भावना स्वागताध्यक्ष कांतीलाल कडू यांनी व्यक्त केली आहे. तसेच लोकशाहिर नंदेश उमेश यांच्या पहाडी आवाजाने महाराष्ट्र गीत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आण्णाभाऊ साठेंची ‘माझी मैना गावाकडे राहिली अन् जीवाची झालीया काहिली’, या अजरामर गीतांनी साहित्य संमेलनास प्रारंभ होत असल्याने संमेलनही ऐतिहासिक होणार आहे.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील स्व. हरिश्चंद्र चांगू कडू साहित्य नगरीत कवी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि पनवेल संघर्ष समितीने पनवेलकरांचा राज्यात, देशात आणि परदेशातही सन्मान वाढविण्यासाठी पहिल्या साहित्य संंमेलनाचे शनिवारी, 22 जानेवारीला आयोजन केले आहे. सकाळी 8 वाजता शहरातील के. गो. लिमये वाचनालयातून साहित्य दिंडीला ज्ञानोबा माऊली, तुकारामाचे पवित्र स्पंदन देणारा सात्विक गजर निनादणार आहे. हे साहित्य संमेलन, दिंडी सर्वांसाठी खुले असणार आहे. कोरोनाची हाक लक्षात घेवूनच अतिशय देखणे आणि मनोहरी साहित्य संमेलन साजरे करण्याचा संकल्प कांतीलाल कडू आणिं परिसरातील गुणवंत, कीर्तीवंत, नामवंत, यशवंत अशा साहित्यिकांसह कांतीलाल प्रतिष्ठान आणि संघर्षचे सर्व योद्धे, वीरांनी केला आहे, त्याला आज मुहूर्तस्वरूप येत आहे.
साहित्य दिंडीत संत ज्ञानेश्वरी माऊलींची प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवण्यात येणार आहे. सर्व ग्रंथांचे ज्ञानेश्वरीच दिंडीत प्रतिनिधीत्व करेल. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस, उद्घाटक विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष कांतीलाल कडू, उल्हासदादा पवार आणि प्रा. अशोक बागवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर दिंडी नमन, पुजनात सहभागी होऊन माय मराठीच्या संवर्धनाचा अभिजात गुण जोपासण्यासाठी साहित्य ग्रंथ दिंडी खांद्यावर घेत… ‘साता जन्माचीही लाभली पुण्याई, म्हणूनी झाहलो पालखीचे भोई’, असे सूर आळवणार आहेत. दिंडीचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे दिवंगत साहित्यिकांचे स्मरण करत त्यांच्या नावासहित, फलकांच्या तसबिरी वाजत गाजत मिरवणूकीतून स्व. हरिश्चंद्र चांगू कडू साहित्य नगरीपर्यंत नेण्यात येणार आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने साने गुरूजी, दुर्गाबाई भागवत, विजय तेंडूलकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, सुरेश भट, श. ना. नवरे, विंदा करंदीकर, ग. दि. मांडगुळकर, आण्णाभाऊ साठे, शांताबाई शेळके, बहिणाबाई चौधरी, केशवसुत, नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर, द. वा. पोतदार, वामनराव कर्डक, बा. भ. बोरकर, भा. रा. तांबे, द. मा. मिराजदार, दया पवार, नामदेव ढसाळ, शंकर पाटील, व. पु. काळे, म. सु. पाटील आणि ललिता बांठीया आदींचा समावेश असेल.
साहित्य दिंडीतील स्थानिक वारकरी सांप्रदयाने हपभ पुंडलिक फडके यांच्या नेतृत्वाखाली एकवटून ही दिंडी यशस्वी करण्यासाठी चांगलीच कंबर कसून योगदान देतानाच, साहित्य चळवळीचे अर्ध्वयू होण्याचा मानस केला आहे. त्यांच्या सोबतीला वारकर्यांसह धनाजी महाराज पाटील, कृष्णा महाराज पाटील, संजय महाराज पाटील, सुरेश महाराज पाटील, पद्माकर महाराज, रामकृष्ण महाराज घरत, संतोष महाराज सते, सारडेकर महाराज, सुरेश महाराज पाटील, राजेश हुद्दार महाराज, निलेश ढवळे महाराज, भगवान महाराज बोलाडे, गणेश महाराज पाटील, धाऊशेठ पाटील, अनंता महाराज, दिनेश महाराज मते, सुरेश महाराज पाटील आदी हभप मंडळी सहभागी होणार आहे. तसेच कोळीवाडा येथील सरस्वती ब्रास बॅण्ड आणि नवीन पनवेलमधील शिवसह्याद्री ढोल पथकाचे योगदान मोलाचे ठरणार आहे.
सकाळी 9.30 वाजता ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. हे संमेलन सर्वांसाठी खुले आणि विनामुल्य असणार आहे. प्रवेशासाठी कोणत्याही सोपास्काराची गरज भासणार नाही, असे आयोजकांनी आधीच स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, दशसहस्त्रेषु वक्ता अशी ख्याती असलेले डॉ. श्रीपाल सबनिस यांच्या अध्यक्षतेखाली पनवेलचे हे पहिले संमेलन होत आहे. स्वागताध्यक्षांची धुरा, कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी खांद्यावर घेतली आहे. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत उल्हासदादा पवार आणि कवी कुळाचे प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्राचे लाडके कवी, गीतकार प्रा. अशोक बागवे उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात सूत्रसंचालिका स्मिता गवाणकर करतील.
दीपप्रज्वलनानंतर लगेचच महाराष्ट्राच्या पवित्र मातीचे ऋृण व्यक्त करण्यासाठी लोकशाहिर नंदेश उमप यांच्या पहाडी आवाजाचे सूर साहित्य संमेलनाची रौनक वाढवणार आहेत. महाराष्ट्र गीतासोबत ज्येष्ठ साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला अधिक बळ देताना शाहिर अमर शेख यांच्या सहभागाने अजरामर केलेले आणि लढ्याचे स्फुर्लिंग चेतवणारे ‘माझी मैना गावाकडे राहिली’, हे गीत पेश करून पनवेलच्या पवित्र मातीला वंदन केले जाणार आहे. कारण ही भूमीसुद्धा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, गोवा मुक्ती संग्रामाचे प्रणेते हुतात्मा हिरवे गुरूजी आणि गरीब, कष्टकर्यांचा ज्ञानसूर्य दि. बा. पाटील यांच्या विचारांने प्रेरित झालेली आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्ष आणि पाहुण्यांना ऐकण्याचा दुर्ग्धशर्करा योग जुळून येणार आहे.
दुसर्या सत्रातील ‘इलेक्ट्रॉनिक मिडीया आणि राजकीय हस्तक्षेप’, या पहिल्या परिसंवादामध्ये महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक दिनकर गांगल परिसंवादाचे अध्यक्ष असतील. तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विलास आठवले, साम टीव्हीचे संपादक प्रसन्ना जोशी, सामाजिक कार्यकर्ते संजय मंगो आदींच्या विचारांचे सोने लुटता येईल.
दुपारी शुद्ध सात्विक भोजनाच्या शाहीथाटाचा आस्वाद उपस्थित रसिक, श्रोते, चोखंदळ वाचकांना विनामुल्य घेता येईल. त्याच दरम्यान सभागृहाच्या बाहेर पुस्तक प्रदर्शन आणि विक्री स्टॉलवरून मुद्रित साहित्य तुम्हाला नक्कीत साद घालत असेल.
तिसर्या सत्रात ‘सोशल मिडीया आणि साहित्य’ हे दुसरे परिसंवाद रंगेल, फुलेल आणि मानवी मनाला अधिक समृद्ध करेल. त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे उपसंचालक प्राचार्य विजय जोशी अध्यक्षस्थानी असतील. ज्येष्ठ गीतकार कौशल इनामदार, दुर्गेश सोनार आणि प्रा. वृषाली विनायक अंत्यत प्रभावीपणे व्यक्त होणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्याची ही सुवर्णसंधी ठरेल.
कार्यक्रम यशस्वीतेच्या शिखराकडे नेताना कविता आणि गजलेचे एकत्रित सादरीकरण करण्याचा अभिनव प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात पनवेलच्या साहित्य संमेलनात होत आहे. प्रा. अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली ‘काळजातील डाव’ मांडणार्या कवींमध्ये ज्येष्ठ कविवर्य अरूण म्हात्रे, रवी लाखे, ज्योती ठाकरे, आप्पा ठाकूर, मंगेश विश्वासराव, नारायण लाळे, राजीव जोशी, सतिश सोळांकुरकर, प्रा. एल. बी. पाटील, दादासाहेब गावडे, विनायक पवार, बंडू अंधेरे, विशाल उशिरे, कॅप्टन वैभव दळवी, जितेंद्र लाड, संजय गुरव, दीपाली पंडित, ज्योत्सना रजपूत आणि सुनिता रामचंद्र आदींचा सहभाग आणि योगदान कार्यक्रमाला चार चॉंद लावतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गितेश शिंदे करतील.
त्यानंतर पुन्हा उद्घाटन समारंभातील पाहुण्यांच्या सहभागाने सांगता समारंभ होईल. राष्ट्रगीताने कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यात येईल.
