किरण खुडे
राजगुरुनगर (हवेलीनामा ऑनलाइन)  राज्यात दिमाखात उभ्या  असलेल्या सहकार चळवळीमध्ये  माजी आमदार कै. साहेबराव सातकर यांचे तर शैक्षणिक क्षेत्रात माजी आमदार कै. साहेबराव बुट्टे पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याचे अनुकरण पुढच्या पिढ्यांनी करणे हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केले.
      खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आणि खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत सहकारमहर्षी साहेबरावजी सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या विस्तारित नूतन इमारतीचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
       यावेळी व्यासपीठावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार रमेश थोरात, सूर्यकांत पलांडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, संस्था उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, संचालक हिरामण सातकर तसेच रुपाली चाकणकर, प्रताप आहेर, कैलास सांडभोर, डॉ. अनिल खिवंसरा, प्रमोद गानू, हरिभाऊ सांडभोर, बाळासाहेब सांडभोर, बबनराव मांडे, संजय काळे, देवदत्त निकम, मुरलीधर खांगटे ,प्राचार्य डॉ. व्ही.डी. कुलकर्णी, डॉ. एच.एम.जरे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे, शिल्पकार सिमा खेडकर आदी उपस्थित होते.
         पुढे बोलताना पवार म्हणाले, शेतीचा उद्योग हा बेभरवशाचा झाला आहे. आणि केंद्र सरकारने केलेले अडचणीचे कायदे यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. लोकशाहीत कोणत्याही कायद्यावर सविस्तर चर्चा व्हावी, याचसाठी राज्यसभा, विधानसभा आणि लोकसभा असते. परंतु केवळ पंधरा मिनिटांची चर्चा करून एकतर्फी असे शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे आणले गेले आणि त्यामुळे नाईलाजाने बळीराजाला वर्षभर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करावे लागले. अखेर जनशक्ती पुढे माघार घेत केंद्र सरकारला हे तीनही कायदे मागे घ्यावे लागले. परंतु तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांना तुरुंगवास, अन्याय आणि लखिमपूर सारख्या घटनेत काही शेतकऱ्यांना आपले प्राणही गमवावे लागले लोकशाही देशात असे प्रकार अपेक्षित नाहीत.
        देशात आणि राज्यात शेतीकडे प्राधान्याने पाहायला पाहिजे. पुणे जिल्हा सहकारी बँक शुन्य टक्के व्याजाने शेतक-यांना कर्ज देऊ शकते तर इतर ठिकाणी अशा प्रकारे कर्ज देता येईल का, याचाही विचार व्हायला हवा.
      प्रास्ताविकात बोलताना देवेंद्र बुट्टे पाटील म्हणाले की, खेड तालुक्याच्या राजकारणामध्ये कै. साहेबराव सातकर आणि कै. नारायणराव पवार या दोन्हींचे स्वतंत्र तात्कालीन गट होते. परंतु राजकीय आरोप आणि प्रत्यारोप दोन्ही गटांनी एकमेकांवर कधीही केले नाही. केवळ तालुक्याच्या विकासाच्या राजकारणातच हे दोन्ही गट काम करत होते. स्व. साहेबरावजी बुट्टे पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षपदाच्या जागेवर स्व. साहेबराव सातकर यांनी मला हाताला धरून बसवले. आणि उपेक्षित, वंचित आणि मागासघटकांसाठी सर्वसमावेशक काम करा असा संदेश पवार साहेबांनी दिला. त्याच आदर्शांवर कायम राहून संस्थेचा विकास शाश्वत पद्धतीने सुरू आहे. चासकमान धरणाचे भूमीपूजन, पूर्वीच्या खेडचे राजगुरूनगर हे नामांतर आणि शैक्षणिक क्रांती हे स्व. साहेबरावजी बुट्टे पाटील यांचे चिरंतन स्मृतीकार्य आहे. तर विविध राजकीय पदांना नम्र नकार हा त्यांचा त्याग आहे. असेही ते म्हणाले.
   याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,खासदार डॉ. अमोल कोल्हे, हिरामण सातकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमात ‘सहकारमहर्षि ‘ या स्व. साहेबराव सातकर यांच्या जीवनावरील पुस्तकाचे व महाविद्यालयाच्या ‘ ज्ञानदीप ‘ या वार्षिक अकांचे प्रकाशन शरद पवार यांनी केले.
      कार्यक्रमापूर्वी कै. साहेबराव सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचे भूमीपूजन शरद पवार यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश चौधरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *