पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार पार पाडणार असून या परिसराचा विकास करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची,  घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

१ जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी विजयस्तंभ ही एक ऐतिहासिक वास्तू असून लाखो अनुयायांचे प्रेरणा स्थान आहे. या स्थळाचा विकास व सुशोभीकरण केले जावे यासाठी १०० कोटी रुपयांपर्यंतचा बृहत विकास आराखडा तयार करून तो एक महिन्याच्या आत सादर करावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आदेश मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तर बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांच्या समितीचे गठण करण्यात आले आहे. विजयस्तंभ व परिसराचा विकास करताना भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच जिल्हाधिकारी पुणे, यांच्या मार्फत भूसंपादन प्रक्रियेसाथीचा  ३० टक्के निधी तातडीने वितरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्यामुळे आता या प्रक्रियेला वेग येणार आहे.

१ जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्याचे पोलीस आयुक्त, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. दरवर्षी 1 जानेवारी रोजी देशभरातून आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात, त्यांना आवश्यक सोयी सुविधा तसेच विजयस्तंभ व परिसराचा विकास लवकरात लवकर केला जावा. त्यासाठी प्रयत्न केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *