पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरपंच परिषदेनं महाविकास आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच परिषदेनं घेतला आहे. वित्त आयोगाच्या रकमेत कपात करु नये, या बरोबरच विविध मागण्यांसाठी राज्यातील सरपंच आक्रमक झाले आहेत. अनेकवेेळा शासनाची भेट घेवूनही आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. त्यामुळे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवणार असल्याचा इशारा सरपंच परिषद मुंबईचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
सरपंच परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाभरातील सरपंचाचा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे उपस्थित होते. मेळाव्यात काकडे यांनी उपस्थितीत मंत्री गुलाबराव पाटील यांचे सरपंचांसह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यांकडे आपल्या भाषणातून लक्ष वेधले.
वित्त आयोगाच्या रकमेत कपात करण्यात येत आहे. या वित्त आयोगाच्या रकमेत कपात करण्यात येवू नये यासह १० ते १२ मागण्या आहेत. त्याबाबत केंद्र तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र आतापर्यंत मागण्या मान्य झालेल्या नाहीत. मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायत एक दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी दिला.
