शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन)
कोरोना महामारीत लॉकडाऊन होता त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले असुन महावितरणाने शेतकरी व सर्व सामान्य ग्राहकांवरील जुलमी महावसुली बंद करावी अन्यथा मनसेच्यावतीने निषेध म्हणून ६ दिवसानंतर कंदील भेट देण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणचे उप कार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष तेजस यादव,जनहितकक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे,उपजिल्हाध्यक्ष किरण गव्हाणे,रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भरत काळे,शहराध्यक्ष अविनाश घोगरे,उपतालुकाध्यक्ष रविंद्र गुळादे,महिला आघाडीच्या डॉ.वैशाली साखरे,शारदा भुजबळ उपस्थित होते.
मनसेचे तालुकाध्यक्ष तेजस यादव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शेतकऱ्यांचे कोटेशन ३ एच.पी असताना अचानक ५ एच.पी. बिलावर देऊन वाढीव बिल देण्यात येते ही महावसुली नाही का? लाईट बिलावर ३ वर्षापुर्वी फोटो येत होता, अलिकडच्या काळात बिलावर मीटरचा फोटा का येत नाही, यामुळे ग्राहकांना अडचण होत नाही का . बिलाचे वाटप न झाल्याने बिलांच्या रक्कमा थकबाकीत जाऊन त्याला व्याज लावून हा त्रास शेतकऱ्यांना व सर्वसामान्य ग्राहकाला का ? रिडींग पध्दतीमध्ये शाश्वती नसल्याने कधी ग्राहकाला कमी युनिटचे बिल दिले जाते परंतु पुढच्या वेळी ग्राहकाच्या त्या मीटरचे रिडींग घेतले असता युनिटमध्ये १०० युनिटपेक्षा जास्त असल्याने दुप्पट दराने वीज बिल आकारुन त्याला व्याज लावून आकारले जाते, ही महावसुली नाही का ? सुरक्षा ठेव रक्कम दुप्पट घेऊन कनेक्शनसाठी लागणारे साहित्य प्रत्यक्ष ग्राहकालाच आणावे लागते आणि सुरक्षा ठेव रक्कम दुप्पट आकारुन ग्राहकाच्या बिलावर नोंद नाही हा सरळसरळ घोटाळा नाही का ? आदी प्रश्न या निवेदनातून उपस्थित करण्यात आले आहेत.
