पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे निधन झाले मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं राज्यात शोककळा पसरली आहे. नुकतेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरीत पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे.त्यांचा जन्म पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व “जाणता राजा” या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना २०१५ साली महाराष्ट्रभूषण तर २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी, इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. ‘जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १० दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात.
बाबासाहेबांनी दिलेल्या इतिहासाच्या व्याख्यानाची प्रेरणा घेऊन असंख्य शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांनी दिली. अभ्यासक, संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होते. सहाव्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर त्यांनी किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने, कधी बैलगाडीपासून ते घोडेस्वारीपर्यंत मिळेल त्या वाहनाने लक्षावधी प्रवास केला.
बाबासाहेबानी शिवचरित्रावर पहिले व्याख्यान २५ डिसेंबर १९५४ रोजी नागपूर येथे केले. त्या भाषणाला जवळपास शंभर लोक उपस्थित होते. पुढे शिवचरित्रकथन हा त्यांचा ध्यास घेऊन ते जगभर फिरले. वयाची ९९ वर्षे पार झाल्यावरही त्यांची शिवशाहिरी त्याच जोमात चालू होती.
एकदा प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले होते की, “बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच उमगत नाही. व्यक्ती म्हणावे तर तिचे कार्य महाराष्ट्रभर पसरलेले आहे. संस्था म्हणावे तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे”.
