किरण खुडे
राजगुरूनगर  (हवेलीनामा ऑनलाइन)  औरंगाबाद आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये गाड्या भाडोत्री  लावायच्या आहेत. महिना २५ ते ३० हजार रुपये भाडे मिळेल असे आमिष दाखवून अनेकांच्या गाड्या ताब्यात घेऊन या अलिशान गाड्या परस्पर परराज्यात, जिल्ह्यात भाड्याने दिल्याचा किंवा विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यातील अशा ५५ गाड्यांच्या बाबतीत खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इनोव्हा, स्विफ्ट, इको, नेकसान, हुंडाई, आर्टिगा, वॅगनआर अशा विविध कार व महागड्या जीपचा त्यात समावेश आहे. सागर मोहन साबळे (रा. साबळेवाडी, ता. खेड) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात अमोल मनाजी भागडे (रा. पाडळी, ता. खेड) व शुभम बाळू सांडभोर, (रा. थिगळस्थळ, राजगुरूनगर) यांनी फिर्याद दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी दिली.
साबळे हा साबळेवाडीचा माजी सरपंच आहे.
        स्वतःच्या वापरासाठी घेतलेल्या या गाड्या जास्त भाडे मिळण्याच्या लालसेपोटी गाडी मालकांनी साबळेच्या ताब्यात दिल्या. त्यासाठी अनेकांनी बँक, खाजगी फायनान्स कंपन्यांचे कर्ज काढले आहे. कराराने गाड्या दिल्यावर त्यासाठी ड्रायव्हरची व्यवस्था साबळे हाच पाहणार होता. परिणामी गाडी प्रत्यक्षात कुठे वापरली जाणार याबाबत मालक अनभिज्ञ होते. सुरुवातीला साबळे याने भाडे दिले, मात्र पुढे भाडे मिळेनासे झाले. त्यावर चौकशी केली असता साबळे हा उडवाउडवीची उत्तरे गाडीमालकांना देऊ लागला. अनेक महिने असे घडल्यावर काहींनी पोलीस ठाणे गाठले. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. ऐन दिवाळी सणाच्या वेळी आपल्या गाडीचे नेमके काय झाले असावे? या भीतीने गाडी मालकांना धडकी भरली आहे. शिवाय पोलीस, कोर्ट- कचेरी करावी लागणार आहे.
       याप्रकरणी खेड पोलिसांनी चार पथके तयार केली असून सध्या बीड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. आत्तापर्यंत ११ गाड्या ताब्यात मिळाल्या आहेत. साबळेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आरोपी भोसरी पोलिसांच्या ताब्यात आहे. लवकरच नेमका प्रकार समोर येईल. अशी माहीती खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत भोसले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *