किरण खुडे
राजगुरूनगर  (हवेलीनामा ऑनलाइन)  एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करुन शासननियमाप्रमाणे पगार, वेतन आणि भत्ते मिळावेत या मागणीसाठी येथील राजगुरूनगर एसटी बस आगारातील कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि. ७) पहाटेपासून बेमुदत संप सुरू केला.
      येथील राजगुरूनगर एसटी आगाराच्या  बहुतांशी सर्व कर्मचाऱ्यांनी बसस्थानकासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत संप आंदोलन सुरू केले आहे. विदर्भ व मराठवाड्यातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभाग दाखवत एसटीचे सर्व कर्मचारी अचानक संपावर गेल्‍याने राजगुरुनगर बसस्थानकावरून पहाटेपासून एकही एसटी बस स्थानकाबाहेर पडली नाही.
       आगारातील एकुण नव्वद बसगाड्या थांबून राहिल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसाेय झाली. पूर्वकल्पना नसल्याने एसटी बससाठी स्थानकात आलेल्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेकांना पर्याय नसल्याने खासगी महागड्या प्रवासी वाहतूकीचा आधार घेऊन निश्चित स्थळी जावे लागले. यात महिला व लहान मुलांचे प्रचंड हाल झाले.
        निवडणूक कामासाठी, कोरोना सारख्या आजारात एसटी बस आणि कर्मचारी सरकार हक्काने आमचा वापर करून घेते. मात्र सुविधा, सवलती देताना महामंडळ खासगी असल्याचे सांगितले जाते. हा अन्याय कधी संपणार, असा प्रश्न आंदोलकांनी केला आहे. खासगीकरण झाल्याप्रमाणे अनेक बाबतीत ठेकेदार नेमून व्यवस्थापनाने भरमसाठ खर्च करून एसटीची आर्थिक स्थिती अडचणीत आणली आहे.
   तुटपुंजा पगार, लॉकडाऊनमुळे वेतन वेळेवर न होणे, आर्थिक खर्चाची कुंचबणा , कर्मचाऱ्यांच्या कर्जबाजारीपणा, वेळेत पगार होत नसल्यामुळे कौटुंबिक घडी विस्कटलेली आहे. यात   कर्मचाऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा दोष नाही.  कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडला असून, अनेक ठिकाणी आत्महत्या होऊ लागल्या आहेत. शासनाने वेळीच निर्णय घ्यावा यासाठी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. असे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
          राजगुरूनगर आगारातील कर्मचारी संघटना विरहित पध्दतीने या आंदोलनात सहभागी झाले आहेत असे यावेळी सांगण्यात आले. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या. आंदोलनाला खेड तालुका भाजपचा पाठिंबा व्यक्त केला.
     खाजगी प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांनी या आंदोलनातून घसघशीत कमाई केली असून थेट बसस्थानकात शिरून त्यांनी मुंबईसाठी खाजगी प्रवासी  वाहतुकीच्या गाड्या भरल्या. दिवाळी व भाऊबीजेसाठी गावी आलेल्या प्रवाशांचे अव्वाच्या सव्वा भाडे त्यांनी घेतले. एसटी महामंडळाचे राजगुरूनगर ते मुंबई प्रवासभाडे २०० रुपये असताना खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी पाचशे रुपये प्रमाणे प्रत्येक प्रवाशाचे भाडे वसूल केले. अशी माहिती प्रवाशांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *