किरण खुडे
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्टीनंतर खेड तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा सोमवारी १५ जूनपासून नव्या उत्साहात सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे औक्षण, पुष्पवृष्टी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत करण्यात आले. राजगुरूनगर मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सवामुळे शाळा परिसर आनंद, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलून गेला होता.
राजगुरूनगर शहराचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेशोत्सवात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुदृढ आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी टाकळकरवाडी केंद्रांच्या केंद्रप्रमुख श्रीमती पोखरकर, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र आवटे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कडलग, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक द.मा. पिंगळे, विठ्ठल खेडकर, जयसिंग उकिरडे, स्मिता पवळे, गीता सांगडे, रवींद्र साकोरे आदी शिक्षकवृंद पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कडलग यांनी नियमित शिक्षण, वाचनाची आवड आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात आले.
दरम्यान, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांना सन्मानित करण्यात आले. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक मूल्यांची रुजवणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन द.मा. पिंगळे यांनी केले.
