थेऊर (हवेलीनामा प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज व नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्य व बलिदानाने पवित्र झालेल्या ऐतिहासिक किल्ले सिंहगडावर ‘दिपावली पहाट’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समाधी सुशोभीकरण, पूजन, लाठी-काठी प्रात्यक्षिके आणि शिवव्याख्यान यांसारख्या विविध उपक्रमांमुळे दीपावली पाडव्याचा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय ठरला. यादरम्यान हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी सिंहगडाच्या विकासासाठी आणि ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

दिवाळी सणाचे औचित्य साधून गडावरील छत्रपती राजाराम महाराजांचे समाधीस्थळ, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक तसेच येथील अमृतेश्वर मंदिर परिसरात हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांच्या सहकार्याने विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईमुळे सिंहगडाचे सौंदर्य आणखीच खुलून आले असून गडप्रेमी आणि शिवभक्तांनी या आकर्षक नजाराचा मनमुराद आनंद घेतला.

या कार्यक्रमाप्रसंगी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, सदस्य युवराज वांजळे, शुभांगी खिरीड, माजी सदस्य व गड-किल्लेप्रेमी दत्तात्रय जोरकर, सिंहगडाचे अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते, कार्यक्रमाचे आयोजक ॲड. मारुती गोळे, राष्ट्रवादीचे सुधाकर गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सिंहगडावरील शासकीय विश्रामगृह दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असून तांत्रिक अडचणी दूर करून हे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल. तसेच, छत्रपती राजाराम महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिळणारे अत्यल्प अनुदान वाढवून किमान १ लाख रुपये मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रयत्न सुरू आहेत.

वढू-तुळापूरच्या धर्तीवर किल्ले सिंहगडचा सुमारे २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. स्थानिक आमदार भीमराव तापकीर, जि.प. सदस्य रुपाली रमेश कोंडे, पं.स. सदस्य युवराज वांजळे आणि शुभांगी खिरीड यांच्या सहकार्याने या आराखड्याला लवकरात लवकर मंजुरी मिळवण्यासाठी राज्य शासनाकडे प्रभावी पाठपुरावा केला जाईल.

स्वातंत्र्यकाळापासून छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीस्थळाजवळ कायमस्वरूपी वीजपुरवठा नसल्याने पुण्यतिथीच्या वेळी मोठी कसरत करावी लागते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सभापती काकडे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथे लवकरच कायमस्वरूपी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

किल्ले शिवनेरी आणि किल्ले रायगडच्या धर्तीवर किल्ले सिंहगडावरही भव्य प्रवेशद्वार किंवा स्वागत कमान उभारण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली असून, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हे काम मार्गी लावले जाईल.

गडावर पर्यटकांची वाढती संख्या आणि जुन्या कचरा कुंड्यांची झालेली दुरवस्था पाहता, गडावरील स्वच्छता अबाधित राखण्यासाठी हवेली पंचायत समितीच्या माध्यमातून नवीन कचरा कुंड्या उपलब्ध करून दिल्या जातील.

गडावरील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी लवकरच सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची पुणे जिल्हा परिषद अथवा हवेली पंचायत समिती कार्यालयात विशेष आढावा बैठक आयोजित करून सर्व प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील, असे सभापती काकडे यांनी शेवटी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या