किरण खुडे,
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): खेड तालुक्यातील कडूस येथील सामाजिक काम करणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्त्याचे आकस्मिक निधन झाले, कुटुंबाचा मुख्य आधार हरपला. परंतु, स्व. सचिन रामचंद्र शिंदे या तरुणाचे सामाजिक कामच त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबियांच्या मदतीला धावून आले. सामाजिक कार्य करताना जोडलेल्या मित्रपरिवार व नातेवाईकांनी त्यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी एक लाख रुपयांची आर्थिक मदत कुटुंबाकडे सुपुर्द केली.
सचिन रामचंद्र शिंदे यांचे वयाच्या केवळ ४८ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. सचिन हे कुटुंबाचा मुख्य आधार होते. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने कुटुंबावर मोठी आपत्ती कोसळली. सचिन हे विमा प्रतिनिधी म्हणून काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. हे करीत असताना ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. त्यातून त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. हा मित्रपरिवारच त्यांच्या मृत्यूपश्चात कुटुंबाच्या मदतीला धावून आला.
माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, कडूसचे माजी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव ढमाले व मित्रपरिवाराने सचिनच्या कुटुंबासाठी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्याला समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला. एक लाख तीन हजार रुपयांची रक्कम तेथेच जमा झाली. ही मदत दशक्रियेच्या दिवशी कुटुंबियांकडे सुपूर्त केली.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, भैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत शेंडे, खरेदी विक्री संघांचे संचालक संतोष ढमाले, राजगुरूनगर बँकेचे संचालक अविनाश कहाणे, कडुसचे माजी सरपंच राजेंद्र खळदकर, ग्रामपंचायत सदस्या लता ढमाले, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कालेकर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मुसळे,पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद शिंदे, मुख्याध्यापक संजय घुमटकर, दिलीप ढमाले, शशिकांत खळदकर अनिल कहाणे, सर्जेराव पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
