किरण खुडे

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): मी विरोधी पक्षातला आमदार असलो तरी तालुक्याच्या विकासासाठी कोणत्याही मंत्र्यांच्या दारात जाईन. माझे पद घटनात्मक आहे आणि मी शिवसेना (उबाठा) पक्षाशी एकनिष्ठ आहे. तालुक्यातील विकासकामे आणि चाकण येथील अप्पर तहसील कार्यालय यावरून माझ्याबाबतीत तालुक्यात जे नकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रकार सुरू आहे तो धांदात खोटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा हा प्रयत्न खोटारडा आहे. आमदार असतानाची त्यांची कृष्णकृत्य त्यांना आता भोगावी लागतील. अशी टीका खेडचे शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी केली.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तालुक्यातील पाणी योजना, रस्ते, चाकणच्या नियोजित रस्त्यांचा निधी, चासकमान धरणातील बुडीत बंधारे अशा प्रत्येक कामासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. अनेक तारांकीत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचे पुरावे, बैठकीचे इतिवृत्त आणि फोटो आपल्याकडे असल्याचे आमदार काळे यांनी स्पष्ट केले. माझ्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आधी १५ वर्षे सत्तेत असताना स्वतःचं काम दाखवावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजमाला बुट्टे पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते आणि बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, संचालक अशोक राक्षे, अनुराग जैद, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, दीप्ती भोगाडे, विनया मुंगसे, गणेश आरगडे, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, शिवाजी वर्पे, पक्षाचे तालुका प्रमुख आणि राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष रामदास धनवटे, संत तुकाराम साखर कारखान्याच्या संचालक ज्योती आरगडे, एल. बी. तनपुरे आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *