किरण खुडे
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): शहराजवळील चांडोली येथील भीमा नदीकाठाजवळच्या मागासवर्गीय दफनभूमीवरचे अतिक्रमण भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले.
चांडोली (ता खेड ) येथे भीमा नदीच्या काठाजवळ मागासवर्गीय दफनभूमीची जागा आहे. त्याठिकाणी अतिक्रमण करून सिमेंटचे साहित्य बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात आला होता. याबाबत खेड तहसीलदार कार्यालयापासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सर्वांना निवेदने देऊन हे अतिक्रमण हटविण्याची मागणी वेळोवेळी केलेली होती. पोलिसांकडेही अनेकदा तक्रारी दिल्या होत्या. आंदोलनाचे इशारेही दिले होते, पण कार्यवाही होत नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते कार्यक्रमासाठी जमले होते. कार्यक्रम झाल्यानंतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते त्याठिकाणी दफनभूमी येथे गेले आणि घोषणा देत त्यांनी अतिक्रमण हटविले. कार्यकर्त्यांनी तेथे उभारलेले शेड पाडले. त्यानंतर त्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची स्थापना केली. संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, किशोर डोळस, मंगेश जाधव, नीता आल्हाट, कांताराम सोनवणे आदी कार्यकर्ते या कारवाईत सहभागी झाले होते.
