पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी व दोन कनिष्ठ सहाय्यक यांच्या विरोधात लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्धी दिलेल्या पत्रकारानुसार, १)राजेश श्रीराम खंदारे वय 52 वर्ष सहाय्यक प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे, २) अनिल पोपट रंधवे वय 32 वर्ष कनिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे, 3) अतिश केरू शिंदे वय 40 वर्ष कनिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे रा. , मूळ पत्ता मुक्काम पोस्ट वाडेबोल्हाई तालुका हवेली यांच्या विरुद्ध लाच मागणी व लाच स्वीकारणे प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात दिली आहे.

याविषयी थोडक्यात माहिती अशी की,तक्रारदार हे जिल्हा परिषद पुणे येथे शिक्षण सेवक म्हणून नोकरीस आहेत. तक्रारदार यांची शिक्षण सेवक पदावरून उपशिक्षक पदावर पदोन्नती होण्यासाठी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती वेल्हे यांच्या मार्फतीने तक्रारदाराच्या पदोन्नतीचा प्रस्ताव शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे पाठवण्यात येणार होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी जिल्हा परिषद पुणे येथील शिक्षण विभागाचे अधीक्षक खंदारे यांची दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना शिक्षण सेवक पदावरून उपशिक्षक पदावर पदोन्नती देताना जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी आधीसंख्य पदावर वर्ग करून घेतो व इतर सेवाविषयक व सेवानिवृत्ती विषयक लाभ मिळवून देता येतील अशी शिफारस करून तक्रारदाराचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्याकरता शिक्षण विभागातील अधीक्षक खंदारे यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी 3 लाख रुपयाच्या लाचेची मागणी करून अधिसंख्य पदावर वर्ग करून घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयातील रंधवे हे सांगतील त्या नमुन्यात प्रस्ताव तयार करून त्यावर गटशिक्षणाधिकारी वेल्हे यांची शिफारस घेऊन तो प्रस्ताव समक्ष घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी रंधवे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती वेल्हे यांच्याकडे जमा करून त्या प्रस्तावावर गटशिक्षण अधिकारी यांची शिफारस घेऊन तो प्रस्ताव दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद पुणे येथे जमा केला. तक्रारदाराच्या पदोन्नतीसाठी व त्यांना जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करून घेण्यासाठी तसेच त्याबाबतच्या सर्व इतर सेवा विषयक व निवृत्ती विषयक लाभ मिळतील अशा प्रकारची शिफारस करून प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी खंदारे हे तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची लाच मागत असल्याबाबतची तक्रार तक्रारदाराने दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी दिली होती.

दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान खंदारे व रंधवे यांनी तक्रारदाराच्या वरील कामासाठी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयाची मागणी करून तक्रारदाराकडून यापूर्वीच पंचवीस हजार रुपये लाच स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित २ लाख ७५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

दिनांक ६ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान लोकसेवक अनिल रंधवे व त्यांचे सहकारी अतिश शिंदे या दोघांनी तक्रारदाराकडून २ लाख ७५ हजार रुपये लाच स्वीकारली असता १६:५९ वा. ९३ एवेन्यू मॉल च्या समोर बी.टी. कवडे रोड, हडपसर, पुणे, या ठिकाणी दोघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांच्याविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *