किरण खुडे

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष व खेड तालुक्यातील युवा नेते मयूर मगन दौंडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पक्ष प्रवक्ते नवनाथ बन, आमदार निरंजन डावखरे, आमदार अभिमन्यू पवार तसेच कार्यालयीन प्रभारी रवींद्र अनासपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मयूर दौंडकर यांनी गेल्या सात वर्षांपासून आम आदमी पार्टीमध्ये सक्रिय राजकीय कार्य करत युवा संघटन उभारणी, जनआंदोलन, संघटनात्मक विस्तार तसेच विविध सामाजिक व जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले. युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभर युवकांना संघटित करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

भाजपा पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना दौंडकर म्हणाले की, “देशहित, विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कार्य करणारी भारतीय जनता पार्टीची विचारधारा मला प्रेरणादायी वाटते. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून युवकांना संघटित करणे, स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका घेणे आणि जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम करण्याचा माझा संकल्प आहे.”

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर काम करत विकासाभिमुख राजकारण अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल. त्यांच्या या प्रवेशाचे युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *