किरण खुडे
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : शहीद दिनानिमित्त येथील राजगुरूनगर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सायकलिंग स्पर्धा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाली. स्पर्धेला नागरिकांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विविध वयोगटांतील सुमारे एक हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
राजगुरूनगर बसस्थानक येथील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव स्मृतीशिल्प येथून सायकलिंग स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. स्मृतीशिल्प येथून निघून सायकलिंग रॅली वाडा रस्ता मार्गे पांगरी, बुट्टेवाडी, सातकरस्थळ रोड मार्गे कोहिणकरवाडी, तिन्हेवाडी रस्ता, पंचायत समिती चौक, वाडा रस्त्यावरील पाण्याची टाकी, केदारेश्वर नवीन पूल, व राजगुरूवाड्याजवळील पुलावरून हुतात्मा राजगुरु वाडा येथे सांगता. असा एकूण १३ किलोमीटरचा मार्ग होता.

स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर यांच्या हस्ते व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीतआले होते. समारोपानंतर विजेत्यांना रोख पारितोषिक, व सर्व सहभागी स्पर्धकांना पदक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक – ओम कोऱ्हाळे (खुला गट), सृष्टी पांडुरंग बोंबले(महिला गट). द्वितीय क्रमांक- पांडुरंग बोंबले(खुला गट), मनस्वी राजपूत (महिला गट). तृतीय क्रमांक – आराध्य राऊत (खुला गट), वैष्णवी थिगळे (महिला गट).
या स्पर्धेमुळे नागरिकांमध्ये शहीद राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांचे विचार आजच्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी व सायकल वापरून आरोग्याविषयी जागरूकता होण्यास मदत झाली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायकल रॅली समिती मधील नगरसेवक सदस्य वैभव घुमटकर, अमोल वाळुंज, दिनेश सांडभोर, मित्रसेन डोंगरे, सागर सातकर, स्नेहल राक्षे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरीक्षक जगदीश नागलोत, रचना सहायक मयुर आगरकर, सभाअधिक्षक स्वाती आरोटे, लिपिक गणेश देव्हरकर, ग्रामस्थ व इतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
