किरण खुडे
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : बीबीए व एमबीए सारखे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी व्यावसायिकता जोपासावी. शिक्षणातून जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करावा आणि निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तमाचा ध्यास घ्यावा असे आवाहन येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड देवेंद्र बुट्टेपाटील यांनी केले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व एमबीए कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या बँकिंग व वित्तीय प्रदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
या प्रसंगी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, डॉ. शिल्पा जगताप, प्रा. प्रियंका बालघरे, डॉ. संजय शिंदे उपस्थित होते.
अँड देवेंद्र बुट्टेपाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करून या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना वित्तीय व्यवस्थापन, बँकिंग व्यवहार आणि डिजिटल अर्थव्यवस्थेबद्दल व्यावहारिक ज्ञान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी हस्तलिखित हिशोबाच्या वह्यांपासून ते आधुनिक डिजिटल वॉलेटपर्यंत वित्तीय क्षेत्रात झालेल्या बदलांचे प्रभावी सादरीकरण केले. बँकिंग प्रणालीचा इतिहास, ऑनलाइन बँकिंग, युपीआय व्यवहार, डिजिटल पेमेंट प्रणाली याबाबत माहितीपूर्ण माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुजाता बोऱ्हाडे, सूत्रसंचालन प्रा. उषा जाधव, आभार प्रा. मीनल भोगाडे यांनी मानले.
