किरण खुडे
राजगुरुनगर :(हवेलीनामा प्रतिनिधी) : लाल, पिवळा, नारंगी अन् पांढर्या रंगांच्या साखरेच्या गाठींच्या खरेदीसाठी झालेली गर्दी, विविध आकारातील गाठींनी सजलेली दुकाने हे उत्साही चित्र सध्या राजगुरूनगर शहराच्या बाजारपेठेत दिसत आहे.
गुढीपाडव्याच्या आनंदी सण एक दिवसावर येऊन ठेपल्याने साखरेच्या गाठींच्या खरेदीसाठी शहरातील जुना मोटार स्टॅन्ड, बाजारपेठ येथे लगबग पाहायला मिळत आहे. वैविध्यपूर्ण रंगांतील गाठींसह सुकामेवा (ड्रायफ्रुट) असलेल्या साखरगाठी हे या वर्षीचे वैशिष्ट्य आहे. असे तीन पिढ्यांपासून परंपरागत या व्यवसायात असणाऱ्या देवकर परिवारातील प्रतिक प्रमोद देवकर यांनी सांगितले.
गुढीपाडव्याचा सण गुरुवारी (दि. १९) आनंदात साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरासमोर गुढ्यांना बांधल्या जाणार्या साखरेच्या गाठीला मागणी असते. विविध रंगांतील गाठी सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लाल, गुलाबी, पिवळा, नारंगी, गुलाबी रंग लक्ष वेधून घेत आहे. एक गाठी वीस रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत मिळत आहे.
सध्या साखरेच्या गाठी बनविण्याच्या कारखान्यात लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळेच सणाचा गोडवा वाढविण्यासाठी गाठींच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. कारखान्यांमध्ये तयार करून या गाठी होलसेल भावात दुकानांमधून विकल्या जात आहेत.
व्यावसायिक प्रतिक देवकर म्हणाले, आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसर्या दिवसापासून कारखान्यात साखरगाठी बनविण्यास सुरुवात करतो. अनेक वर्षांपासून रोज १०० किलोच्या साखरगाठी तयार करून त्याची होलसेल भावात विक्री करीत आहोत. छोट्या आकारातील गाठींची किंमत २० रुपयांपासून आहे, तर मोठ्या आकारातील गाठी १०० रुपयांपासून पुढे आहे. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसाईक गॅस सिलिंडर मिळणार नाही असे समजल्याने नाईलाजास्तव डीझेल भट्टी व जळाऊ लाकडांचा वापर करून भट्टी तयार तयार करावी लागली. यामध्ये अनंत अडचणींचा सामना करावा लागला. तसेच इतर कच्च्या मालाचे व मजूरीचे दर वाढले त्यामुळे नाईलाजास्तव गाठींच्या किमती २५ टक्के वाढवाव्या लागल्या आहेत.
