किरण खुडे

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरी गावातील शिवलेवस्ती येथे सुरू असलेल्या बेकायदा तीनपत्ती जुगार अड्डयावर खेड पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १० संशयीत आरोपींसह १५ ते २० जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे २८ लाख १८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. खेड तालुक्यात अवैध धंद्याविरोधात गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मोठी कारवाई झाल्याची चर्चा आहे.

ठाकूर पिंपरी येथील बाळू विष्णू शिवले यांच्या पत्राशेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर खेडचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तेथे छापा टाकला. पोलिस हवालदार सुनील ज्ञानेश्वर बांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी संशयीतांकडून अंगझडतीदरम्यान रोख रक्कम व पत्ते जप्त करण्यात आले. त्यामध्ये सतिश धोतरे, शंकर धोतरे, दिगंबर परांडे, धनंजय भिसुरे, ब्रह्मानंद माळी, संतोष पवार, रोहित धोतरे आदींचा समावेश आहे. यांच्याकडून प्रत्येकी ५०० ते १,००० रुपयांदरम्यान रोख रक्कम आणि तीनपत्तीचे पत्ते जप्त करण्यात आले. तसेच ठिकाणी ठेवलेल्या पत्त्यांच्या डेकमधून ३३ पत्तेही जप्त करण्यात आले.

या कारवाईदरम्यान १० पत्त्यांचे कॅट, जुगारासाठी वापरलेले ५ गोल टेबल, ४० खुर्च्या आणि मोठ्या प्रमाणावर वाहने जप्त करण्यात आली. एकूण ४० हून अधिक वाहनांमध्ये दोन फॉर्च्यूनर, एक इनोव्हा, स्विफ्ट, आय-२०, बलेनो, सँट्रो, वॅगनआर यांसारख्या कार तसेच स्प्लेंडर, पॅशन, ॲक्टिव्हा, शाईन यांसारख्या दुचाकींचा समावेश आहे. तर दोन रिक्षाही जप्त करण्यात आल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, या जुगार अड्डयाचे मुख्य आयोजक म्हणून बाळू शिवले, बाबू ढमाले आणि नवनाथ धोत्रे यांची नावे समोर आली आहेत.

स्थानिक नागरिकांना या अड्डयामुळे त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती असून भीतीमुळे कोणी तक्रार करण्यास धजावत नव्हते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पुढील तपास सुरू असून आणखी काही संशयितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *