किरण खुडे,

राजगुरूनगर :(हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरूनगर एसटी बसस्थानकावरून राजगुरुनगर ते अकोला या एसटी बससेवेचा प्रारंभ करण्यात आला असून या एसटी बससेवेला प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आगारव्यवस्थापक विद्या कदम व प्रवाशी यांच्या हस्ते गाडीचे पूजन करुन बस मार्गस्थ करण्यात आली.

प्रवाशांच्या मागणीनुसार या बससेवेचा प्रारंभ करण्यात आला असून राजगुरूनगर एसटी बसस्थानकावरून दररोज सकाळी सात वाजता ही बस अकोलाकडे चाकण, शिक्रापूर, शिरूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, चिखली, खामगाव यामार्गे मार्गस्थ होत आहे. तसेच अकोला येथे मुक्कामी ही बस पोहचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता राजगुरुनगरकडे परतीच्या प्रवासाला निघत आहे, असे यावेळी बोलताना आगारव्यवस्थापक विद्या कदम यांनी सांगितले. राजगुरूनगर, चाकण, शिरूर या भागात नोकरीव्यवसायानिमित्त खामगाव, नागपूर, अकोला, चिखली या भागातील अनेक नागरीक वास्तव्यास आहेत. या प्रवाशांना या बससेवेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व थांब्यांवर थांबणारी, सर्व प्रकारच्या तिकीटदरातील सवलती व प्रचलित साध्या बसच्या तिकीटदरामुळे ही बस अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे.

या बससेवेच्या मार्गस्थ होताना प्रारंभी पुजन करण्यात आले. यावेळी आगारव्यवस्थापक विद्या कदम, स्थानक प्रमुख उत्तम लांडे, वाहतूक निरीक्षक नासिर हवालदार, वरिष्ठ लिपीक स्नेहा कातोरे, वाहतूक नियंत्रक चंद्रकांत लोखंडे, मोहन गोपनारायण आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *