किरण खुडे,

राजगुरुनगर :(हवेलीनामा प्रतिनिधी) : मराठी भाषा आणि साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कल्पकता आणि भाषेचा अचूक वापर करण्याचे कौशल्ये असेल तर पटकथा लेखन, जाहिरात लेखन, पत्रकारिता या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे यांनी केले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलत होते.

या प्रसंगी उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय शिंदे, प्रा. स्मिता कोळेकर, डॉ. बाळासाहेब अनुसे, डॉ. दिलीप मुळूक, प्रा. किशोर लांडेपाटील, डॉ. डी. एम‌.मारकड, डॉ. प्रभाकर जगताप, प्रा. हेमलता चौधरी, प्रा. ओंकार टाकळकर उपस्थित होते.

कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे यांनी अभिवादन केले. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषा गौरव दिन म्हणजे मराठी समाजाचा, संस्कृतीचा गौरव असून प्रत्येक मराठी जनाला मराठीपणाचा अभिमान वाटला पाहिजे.‌ विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन, श्रवण, भाषण, संभाषण अशी भाषिक कौशल्य आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. संजय शिंदे यांनी कवी कुसुमाग्रजांच्या साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला.आजचा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वाटचालीला उजाळा देण्याचा असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. पार्थ खाडीलकर यांनी थॉमस कँडी यांचे मराठी भाषेला योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. थॉमस कँडी यांनी स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह अशा पाच विरामचिन्हांच्या माध्यमातून मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

साक्षी शिवेकर या विद्यार्थिनीने संत साहित्य आणि मराठी भाषा या विषयावर मनोगत व्यक्त केले.‌ प्राची बोत्रे, गायत्री देशमुख, ओंकार बोटकुळे, सारंग शिंदे या विद्यार्थ्यांनी अनुवादित पुस्तकांचा परिचय करून दिला. या वेळी प्रा. पार्थ खाडीलकर यांनी मराठी भाषा प्रतिज्ञेचे वाचन केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. संजय शिंदे तर आभार प्रा. डॉ. बाळासाहेब अनुसे यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *