किरण खुडे
राजगुरुनगर :(हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरुनगर एसटी बस स्थानकावर कर्मचारी व प्रवाशांच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विविध विषयांवर मनोगत आवडत्या पुस्तकांचा परिचय, काव्यवाचन इत्यादी उपक्रम राबविण्यात येऊन मायमराठीचा जागर करण्यात आला.
कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला स्थानक प्रमुख उत्तम लांडे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी जेष्ठ पत्रकार किरण खुडे, वाहतूक निरीक्षक नासिर हवालदार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक एम. एफ. सय्यद, कार्यशाळा अधिक्षक अनंत कुंदे, लेखापाल हिरामण दिघे, वरिष्ठ लिपीक स्नेहा कातोरे, वाहतूक नियंत्रक विष्णू राठोड, रोहीणी साबळे, स्वाती बिराजदार, मनिषा सुतार, विजया बगाटे, गोविंद वरे, पी.ए.किर्दक, बबलू दौंडकर, पवार, महेश बिरदवडे, एस. एम. मोसे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना विष्णू राठोड म्हणाले की, मराठी भाषा गौरव दिन म्हणजे आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वाटचालीला उजाळा देण्याचा दिवस आहे. स्वतःची भाषा विकसित करा, चांगले मराठी प्रयत्नपूर्वक ऐका व बोला असे त्यांनी प्रवाशांना आवाहन केले.
स्नेहा कातोरे यांनी महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा पुढे नेणाऱ्या कुसुमाग्रजांच्या साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला. त्यांची कविता काळाशी लढण्याचे बळ देते, असे त्या म्हणाले.
लेखापाल हिरामण दिघे यांनी मराठी आवडत्या पुस्तकांचा परिचय करून दिला. यावेळी मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी ‘ या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन एम. एफ. सय्यद यांनी केले.
