किरण खुडे,
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : खेड तालुक्याच्या पुर्व भागातील कनेरसर गावाजवळील एका इंजिनिअरिंग कंपनीसमोर जमीन विकसनाच्या कामावरून वाद निर्माण होऊन १० ते १५ जणांच्या टोळीने एका २२ वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शेखर पोपट तांबे (वय २२, रा. वरुडे, ता. खेड) हे जखमी झाले आहेत.
एसईझेड प्रकल्पात असलेल्या आणि नव्याने होणाऱ्या कंपन्यांमध्ये कामे मिळवण्यासाठी अनेकदा टोळीयुध्दे झाली आहेत. गेल्या काही वर्षांत खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. त्यावर पोलिस यंत्रणेला नियंत्रण ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहे.
खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर तांबे हे शेती आणि जमीन विकसनाचा व्यवसाय करतात. बुधवारी (दि. १८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कनेरसर येथील एका कंपनीसमोर त्याचे जमीन विकसनाचे काम सुरू होते. त्या वेळी संशयीत आरोपींनी कंपनीचे अधिकारी सुंदरम यांच्याशी याच कामावरून वाद घातला. शेखर तांबे याने सुंदरम यांना वाचवण्याचा मार्ग काढून त्यांना जेवणासाठी घरी जाण्यास सांगितले आणि वाद थांबवण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी संशयीत आरोपी सिध्दार्थ झोडगे याने “तुला खूप माज आला आहे, आम्हाला येथे काम करायचे आहे” असे म्हणत शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला केला. त्याने लाकडी काठीने पाठीवर आणि डाव्या खांद्यावर मारहाण केली. जय चौधरी याने तोंडावर हाताने मारून तरुणाला खाली पाडले आणि लाथा मारल्या. नंतर दगडाने डोक्यावर मारहाण केल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय मनोज मकाळे, सिद्धार्थ झोडगे, कमलेश दौंडकर, संकेत दौंडकर, स्वागत माशेरे (सर्व रा. कनेरसर, ता. खेड) व जय चौधरी (रा. पाबळ, ता. शिरूर) आणि इतर १० ते १५ अज्ञात व्यक्तींनी लाकडी काठी, दगड आणि हाताने-लाथांनी मारहाण केली. या हल्ल्यात बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ३४७(बेकायदेशीर जमाव), ३२३ (स्वेच्छेने दुखापत), ३२४ (घातक शस्त्राने दुखापत), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, आरोपींचा शोध चालू आहे. जखमी तरुणला उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.
