अर्जुन मेदणकर,

आळंदी (हवेलीनामा प्रतिनिधी) : जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्या रविवारी ( दि. २२ ) सकाळी ८ ते ११ वाजे पर्यंत परम श्रद्धेय निरंकारी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनात संपूर्ण भारतभर एकाच वेळी सुमारे १५०० वर ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येत आहे. संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, हा विशाल उपक्रम देशभरातील १५०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाईल. या महामोहिमेचे हे अभूतपूर्व प्रमाण या मोहिमेला ऐतिहासिक स्वरूप देईल, ज्यामुळे जलसंधारण आणि स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावी पणे समाजात जाणार आहे.

पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे हि जागृती समाजात निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने सदगुरु बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन २०२३ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली होती. जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एखाद्या दिवसापुरता किंवा मर्यादित मोहिमे पुरता न ठेवता तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा होत आहे. जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडू शकेल.

नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी व झरे अशा नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी समर्पित या जनआंदोलनाने आपल्या पहिल्या तीन टप्प्यांत सेवा, समर्पण व सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे. याच यशामुळे प्रेरित होऊन हा चौथा टप्पा अधिक व्यापक, संघटित व दूरदृष्टीपूर्ण स्वरूपात राबविला जात आहे, ज्यामुळे समाजातील प्रत्येक घटकात निसर्गाबद्दल जागरूकता व सहभागाची सशक्त भावना निर्माण होईल.

मधुर समूह गायन, जनजागृती चर्चासत्रे आणि सोशल मीडिया मोहिमेद्वारे जलजन्य आजार आणि स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले जाणार आहे.जेव्हा मन निर्मळ असते तेव्हाच निसर्ग स्वच्छ राहतो, आणि जेव्हा सेवेत समर्पण असते तेव्हा समाजाचे नवनिर्माण होते हे अभियान त्याच संकल्पनेला बळ देणारे आहे.

सतगुरु माताजींचा संदेश सदैव हाच राहिला आहे की, आपण ही पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित स्वरूपात जपून ठेवली पाहिजे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे, जे समाजाला निसर्ग, समाज व आत्म्याशी जोडून करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्याच्या दिशेने पुढे नेण्याचे काम करेल. या स्वच्छता अभियानात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले आहे. आळंदी परिसरातील विविध सेवाभावी संस्था, सेवाभावी कार्यकर्ते, भाविक, नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांचे वतीने त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *