अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी). सातारा जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. जिल्ह्यात एकूण ६५ जिल्हा परिषद गटांपैकी भाजप २७, राष्ट्रवादी काँग्रेस २१, शिवसेना (शिंदे गट) १४, काँग्रेस १ आणि इतर २ पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सर्वच पक्षांसमोर सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.
सत्ता स्थापनेच्या बहुमताचा आकडा हा ३३ आहे भाजप सर्वाधिक जागा मिळवूनही बहुमतापासून दूर राहिला असून, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. या दोन पक्षांची एकत्रित संख्या ३५ होत असल्याने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले बहुमत सहज पूर्ण होत आहे.
दरम्यान, या सत्तास्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन काका पाटील, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिल्ह्यातील राजकीय निर्णयांवर या नेत्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी काय पावले उचलली जाणार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खासदार उदयनराजे भोसले भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले हे काय निर्णय घेणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्याची आकडेमोड पाहता राष्ट्रवादी-शिवसेना शिंदे गटाची आघाडी अधिक मजबूत दिसत आहे. येत्या काही तासांत किंवा दिवसांत जिल्हा परिषदेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, याचे चित्र स्पष्ट होणार असून सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
