किरण खुडे

राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, कुंभमेळा कालावधीत नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ २०२५ मधील अनुभव लक्षात घेऊन, भविष्यातील वाढत्या भाविकसंख्येच्या सुरक्षित व सुव्यवस्थित व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७ – गर्दी व्यवस्थापन व सुविधा विकास)’ यास मंजुरी दिली आहे.

या आराखड्यांतर्गत भाविकांसाठी सुरक्षित, सुसज्ज व सोयीस्कर सुविधा निर्माण करण्यासाठी नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश–निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच आधुनिक गर्दी व्यवस्थापन प्रणालीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. कुंभमेळ्यापूर्वी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

कुंभमेळ्याच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता जुना सभामंडप अपुरा ठरणार असल्याने नवीन सभामंडप उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी जुना सभामंडप पूर्णतः उतरविण्यात आलेला असून, पायरी मार्गाचे कामही सुरू आहे. सध्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडी बांधकाम, बांधकाम साहित्य व अवजड यंत्रसामग्री ठेवण्यात आलेली आहे.

कामांचे स्वरूप, परिसरातील भौगोलिक परिस्थिती आणि दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे व विकास आराखड्यातील कामे नियोजित वेळेत पूर्ण करणे या उद्देशाने यापूर्वी मंदिर तीन महिन्यांसाठी (महाशिवरात्री कालावधी वगळून) तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, सध्या सुरू असलेल्या कामांचा वेग, व्याप्ती व सुरक्षेच्या दृष्टीने सखोल आढावा घेतल्यानंतर, महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेले दगडी बांधकाम व साहित्य हलविणे शक्य नसल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.

श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा भाग असून जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे त्या काळात बांधकाम करणे शक्य नसते. उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करण्यासाठी विकासकामांना गती देणे अत्यावश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून, दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते दि. १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्री कालावधीतही श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे.

भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *