अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) वैद्य भेटला सुखदाता रोग पालट झाला आता.. या अभंगावर अतिशय सुश्राव्य कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण चारुदत्तबुवा आफळे यांनी सज्जनगडावर सादर केले. दासनवमी उत्सवात आयोजित संगीत गायन, वादन, कीर्तन सोहळ्यामध्ये श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून आफळे बुवांनी केलेले किर्तन अतिशय रंगतदार असे ठरले.
या अभंगावर निरूपण करताना समर्थांनी सद्गुरु वर हे रूपक केल्याचे सांगत आपल्या आयुष्यातील भवरोग बरे करण्यासाठी संत हे वैद्य आहेत. मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागले पाहिजे .जसा वाल्या कोळ्याचा महाराजांनी सांगितल्यामुळे त्याने घरातील लोकांची परीक्षा केली, तेव्हा त्याला खरा अर्थ कळला उपरती झाली. आणि मग रामनामाचा रस त्याच्यासाठी सर्वत्र भरला. आणि त्याला दिव्यत्व प्राप्त झाले .याप्रमाणे संतांच्या सांगण्याप्रमाणे आचरण केले तर सुखदायी होते .जीवन अतिशय सुलभ होते असे विचार आपल्या बहारदार कीर्तनातून आपले बुवांनी सादर केले.
यामध्ये आख्यान सादर करताना वऱ्हाड प्रांतात असलेल्या बाळापूर येथील समर्थांचे शिष्य असणाऱ्या बाळकृष्ण बुवा हे राहत होते .वयाने वयोवृद्ध झाल्यामुळे बाळापुर ते सज्जनगड हे दरवर्षी दासनवमी साठी पायी वारी करणे जमत नव्हते. त्यामुळे आता समर्थांच्या दर्शनाला येता येणार नाही म्हणून त्यांना दुःख झाले .समर्थांनी स्वतः स्वप्नात दृष्टांत दिला आणि तु दासनवमी उत्सव कर. मी नवमीच्या दिवशी येईन .असा दृष्टांत दिल्यावर बाळापुर मधल्या दासनवमी उत्सवांत स्वतः नवमीच्या दिवशी गजानन महाराजांच्या सोबत समर्थ आले, आणि तुला वचन दिल्याप्रमाणे आलो आहे. असे सांगून आनंद झाला.
याचे तात्पर्य हेच की गुरुने जरी रूप बदलले तरी स्वरूप एकच असते. तसे देवाच्या मूर्ती अनेक असल्या तरी देवत्व हे एकच असते हे लक्षात घ्यावे. आणि याचे तात्पर्य हेच असे की साधकांनी स्पर्धा सोडावी आणि उपासना वाढवावी .याप्रसंगी आफळे बुवा यांना ऑर्गनवर साथ सुशील गद्रे यांनी केली तर तबला साथ अभिनव जोशी यांनी ,व्हायोलिनवर उदय गोखले यांनी साथ केली.या सर्व कलाकारांना अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी रामनामी शाल ,समर्थ प्रसाद देऊन गौरव केला. यावेळी सर्व कलाकारांची ओळख व त्यांचा परिचय मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी अतिशय सुरेखपणे करून दिली .कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
