थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवड निवडणूक निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच जिल्हा परिषद जागेपैकी चार जागा बळकावल्या आणि केवळ एकच जागेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला तर पंचायत समितीच्या एकूण दहा जागांपैकी पाच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस चार जागेवर भारतीय जनता पक्ष तर एका जागी अपक्षाने बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमधील उमेदवारी मिळविण्या करिता झालेली धुसफुस आणि त्यातून पक्षांतर करून मिळवलेली उमेदवारी यामुळे पूर्वे हवेलीतील अनेक जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीच्याच उमेदवारात लढत होणार असे चित्र दिसून आले कुठल्या कार्यकर्त्याचे आपल्या मतदारांवर प्रभुत्व आहे हे दर्शविण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने वेगवेगळे हातखंडे वापरले गेले दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे अपघाती निधन झाले त्यानंतर सर्वच उमेदवारांनी जाहीर प्रचार करण्यापेक्षा उमेदवारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रचारावर जोर दिला त्यामुळे मतदारांशी संपर्क करून आपल्या भूमिका स्पष्ट केल्या तसा पूर्व हवेली हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो परंतु गेल्या काही दिवसांमध्ये या भागात भारतीय जनता पक्षाने काही तगडे उमेदवार दिल्याने निवडणूक रंगतदार अवस्थेत पोचली होती.
वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते आणि राजकीय गणिते उलट सुलट केली जात होती त्यातूनही राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखत विरोधकांना धोबीपछाड दिल्याचे या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवलेल्या जिल्हा परिषद गटांमध्ये केसनंद कोरेगाव मूळ, थेऊर,उरुळी कांचन आणि लोणी काळभोर यांचा समावेश आहे. तर केवळ पेरणे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे
