अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी ).समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि त्यांची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्री दासनवमी उत्सव सध्या बहरत आहे याचे औचित्य साधून दरवर्षी दिला जाणारा श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने 2025 चा श्री संत सेवा पुरस्कार यावर्षी आज गुरुवारी मंडळाच्या भक्तनिवासात मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. गुरुनाथ महाराज कोटणीस यांच्या हस्ते ज्येष्ठ निरूपणकार, राम कथाकार रवींद्र पाठक यांना प्रदान करण्यात आला .
सन्मानपत्र, रामनामी ,शाल, समर्थ प्रसाद असे या पुरस्काराचे स्वरूप होते .यावेळी सातारा येथील वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले, ज्येष्ठ निरूपणकार व सज्जनगड मासिकाचे संपादक प्रा.डॉ.अजित कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला .यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी, हा पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार रविंद्र पाठक यांना देताना विशेष आनंद होत असून मंडळाच्या वतीने या संत आणि संत प्रकारच्या लोकांना हा पुरस्कार गेली पंधरा वर्षे हा पुरस्कार मंडळाच्या वतीने योग्य व्यक्तींना वितरित करताना प्रदान करताना मोठा आनंद होत असल्याचे सांगितले. यावेळी या सन्मानपत्राचे वाचन सौ.रसिका ताई ताम्हणकर यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे व अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस म्हणाले की,राम कथेचे निरूपण करत राम कथाकार रवींद्र पाठक यांनी खूप मोठ्या प्रमाणावर नाम साधनेचे महत्त्व संपूर्ण देशात नव्हे तर परदेशात सांगण्याचे मोठे काम केले आहे .समर्थ आणि गोंदवलेकर महाराज यांचा कृपाशीर्वाद त्यांना प्राप्त झालेलाच आहे, आणि हा पुरस्कारही त्याचीच एक प्रचिती आहे .
यावेळी प्रा.डॉ .अजित कुलकर्णी यांनीही या पुरस्काराचे औचित्य हे खरोखरच अतिशय वेगळे असून समर्थांच्या कृपेचा आशीर्वादच पाठक यांना या पुरस्कारामुळे प्राप्त झाल्याचा मोठा आनंद होत असल्याचे सांगितले. वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी यावेळी वेदमंत्राचा जयघोष करत रवींद्र पाठक यांना दिलेला पुरस्कार हा अतिशय योग्य व्यक्तीला देत असताना विशेष आनंद होत असून यावेळी त्यांनी रवींद्र या नावाच्या राजाचा इतिहास उपस्थितांना सांगितला .
पुरस्कार प्राप्त झाल्यावर उपस्थितांपुढे बोलताना रवींद्र पाठक म्हणाले की, हा पुरस्कार माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंद आहे. प्रत्येकालाच राम दर्शन हवं आहे. मात्र शुद्ध ज्ञानाशिवाय राम दर्शन नाही आणि अनुभूती यायला हवी आहे .त्यासाठी देह बुद्धी गळून पडली पाहिजे .ज्ञानाशिवाय या जीवनात काही नाही, शुद्ध ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान यासाठी राम दर्शनाची दिशा प्रत्येकाला मिळायला हवी ,आणि त्यासाठी आमच्या जीवनामध्ये सद्गुरु यायला हवा .गुरुस अनन्य शरण जाऊन त्यांच्याशी एकरूप झाल्यास तुमच्या आत्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी तोच साधा सोपा उपाय आहे .समाधी पाहता समाधान होते असे म्हणतात .खरोखरच समाधान स्वरूप समर्थ येथे सज्जनगडावर आहेत .सद्गुरुला भजणे म्हणजेच समाधान पावण्यासाठी सद्गुरुशी अनन्य होणे. ही दासनवमी आपल्याला आपल्या जीवनात साजरी करता आली पाहिजे.आपल्या मनात नामाला स्थान द्या, नाम देवाचा प्राण आहे .तो आपल्या मुखात कायम राहिला पाहिजे .सदासंगती सज्जनाची घडावी असा निरंतर ध्यास हवा आहे आणि नामस्मरण हे अधिष्ठान झाले पाहिजे .समर्थांची मानस पूजा करावी सद्गुरूंच्या ग्रंथांचे चिंतन करणे सुरू ठेवले तर खऱ्या अर्थाने आत्मज्ञान प्राप्ती होईल. गुरु वचनाचे आपण स्मरण ठेवावे. गुरुवचन आपल्या जीवनाचा दीपस्तंभ झाला पाहिजे. चमत्कारांच्या पलीकडे आपले समर्थ आहेत .गुरुचे धाम सज्जनगड निवासी समर्थ रामदास हे माझे धाम आहेत. हा संग मनाशी बांधला पाहिजे ,आणि म्हणून सद्गुरूंच्या धर्माशी संलग्न राहिले पाहिजे .सद्गुरूंचे नित्य स्मरण तसेच गुरूंच्या स्पर्शलेल्या वस्तूंचे स्मरण करावे.
या कार्यक्रमाची सांगता समर्थ भक्त विद्याधर बुवा वैशंपायन सुश्राव्य समर्थ श्लोक म्हणत केली
या कार्यक्रमास ज्येष्ठ समर्थ भक्त गणपतीबुवा रामदासी ,विद्याताई पुरोहित ,समर्थ भक्त विद्याधरबुवा वैशंपायन ,प्रवीण शास्त्री कुलकर्णी गुरुजी, संतोष वाघ, सुप्रसिद्ध कीर्तनकार लक्ष्मीप्रसाद पटवारी कुलकर्णी, सौ.रसिका ताई ताम्हणकर यांचे सह संपूर्ण देशातून आलेले समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .
