किरण खुडे,
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने आणि संधी निर्माण झाली असून ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी अखंड परिश्रम घेऊन स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन आमदार बाबाजी काळे यांनी केले. ते खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय, एमबीए कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभात बोलत होते.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, नितीन गोरे, सतीश नाईकरे, मुरलीधर खांगटे, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, डॉ. शिल्पा जगताप, प्रा. प्रियांका बालघरे, उपप्राचार्य प्रा. व्ही.बी.दौंडकर, प्रबंधक एन.एम.शिंदे उपस्थित होते.
आमदार बाबाजी काळे यांनी संस्थेच्या सर्व महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे व विविध उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले की, ही संस्था शिक्षणाबरोबर संस्काराचेही केंद्र आहे. या संस्थेत दर्जेदार शिक्षणाबरोबर साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांवर वैचारिक संस्कार होतात. बौद्धिक कौशल्याला संस्काराची जोड मिळाली तर आयुष्यात काहीही कमी पडत नाही असे त्यांनी सांगितले. भौतिक संपत्तीपेक्षा आई वडिलांची संपत्ती म्हणजे मुले असून ते चांगल्या दिशेने जातील, सुसंस्कृत व उच्चशिक्षित होतील या त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.
विद्यार्थ्यांनी चांगल्या वर्तणुकीतून आपल्या आई-वडिलांचा आनंद द्यायला हवा.‌ यामुळे आपल्या पालकांचे आयुर्मान वाढेल असे ते म्हणाले.‌ संस्थेला नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्या- जाण्यासाठी एसटी बसची सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध आहे असेही त्यांनी सांगितले.‌
अध्यक्षीय मनोगतात ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, एकाग्रता, निष्ठा आदी गुण अंगीकारल्यास यश निश्चित मिळेल असे सांगितले. त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पित केली.‌
या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शाखांमधील गुणवंत विद्यार्थी तसेच क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांना व पीएच.डी., सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण प्राध्यापकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.‌ राष्ट्रीय स्तरावरील वैष्णव ठाकूर, अब्दुल अन्सारी (वेटलिफ्टिंग) समीक्षा डुबे (नेटबॉल), राज्यस्तरावरील खेळाडू वैष्णवी होले, ओंकार सावंत, चित्रा सावंत, तन्मय हगवणे, आदित्य गाडेकर, वेदांत साळवे, अर्णव चव्हाण यांचा तसेच भीमाशंकर करंडक स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांसह प्रचिती नेटके, अवधूत धायबर, दिव्या पिंगळे, आदित्य बोरसे यांचाही गौरव करण्यात आला.
अहवाल वाचन प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, डॉ. शिल्पा जगताप यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नीता डोंगरे, परिचय प्रा. मच्छिंद्र मुळूक, पारितोषिक वाचन डॉ. प्रतिमा लोणारी, प्रा. योगेश मोहिते, प्रा. मोनिका काळे यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. विठ्ठल दौंडकर यांनी मानले.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *