अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) जिल्ह्यातील बामणोली परिसरात एमडी ड्रग प्रकरणाचा धूर अद्याप निवळलेला नसतानाच आता कराड तालुक्यातील दुर्गम भागात तुळसणनजीक असलेल्या पाचुपतेवाडी (ता. कराड) येथे पुण्याच्या DRI (डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) विभागाने रविवारी धडक कारवाई केल्याने जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या कारवाईसाठी गुजराथमधून तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, सातारा जिल्ह्यातील स्थानिक पोलीस यंत्रणा आणि कराड पोलीस या संपूर्ण कारवाईबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ही कारवाई उंडाळे गावापासून पुढे दुर्गम भागात असलेल्या पाचुपतेवाडी येथील एका शेडवर करण्यात आली. शेडमध्ये प्रवेश करुन तपास केल्यानंतर संबंधित शेड सील करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. या कारवाईदरम्यान एका नामचीन गुंडाचा समावेश असल्याचे समोर येत असून, त्या गुंडासह काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

विशेष बाब म्हणजे या कारवाईची माहिती सातारा आणि कराड पोलीस यंत्रणेला आधी देण्यात आली नव्हती, अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. सर्वसाधारणपणे अशा मोठ्या कारवाईमध्ये स्थानिक पोलीस बंदोबस्त, परिसर नियंत्रण, वाहतूक नियोजन, पंचनामे, संभाव्य आरोपींच्या हालचाली रोखणे यासाठी सहभागी असतात. मात्र, या कारवाईत स्थानिक पोलीस यंत्रणा प्राथमिक स्तरावरही अनभिज्ञ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे “ही कारवाई गोपनीय ठेवण्याची गरज का पडली?” आणि “स्थानिक पातळीवर माहिती फुटण्याची भीती होती का?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

पथक बाहेरचे असल्यामुळे ही कारवाई केवळ स्थानिक स्वरूपाची नसून, मोठ्या नेटवर्कशी जोडलेली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिनाभरात दुसरी मोठी कारवाई

बामणोली परिसरातील एमडी ड्रग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पाहिले असता, ही महिनाभरातील दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. एका बाजूला बामणोलीकडे एमडी ड्रगचा प्रकार उघडकीस आला होता, तर आता कराड तालुक्यातील दुर्गम भागात शेडवर कारवाई होणे, ही बाब सातारा जिल्ह्यात अवैद्य धंद्यांचे जाळे अधिक भक्कम होत असल्याचे संकेत देते.

यामुळे सातारा जिल्हा काही टोळ्यांसाठी अवैध व्यवहारांचे सुरक्षित ठिकाण बनत चालल्याची गंभीर चर्चा रंगत आहे. विशेषतः दुर्गम भागातील शेड, एकांत ठिकाणे, कमी वर्दळ असलेले रस्ते, बाहेरून माल आणण्यासाठी वापरली जाणारी वाहतूक व्यवस्था याचा गैरफायदा घेतला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

संशय आणि चर्चेला उधाण

दरम्यान, सूत्रांकडून कित्येक हजार कोटींचे ड्रग्स सातारा जिल्ह्यात असू शकतात असा संशय व्यक्त केला जात आहे. ही आकडेवारी अत्यंत मोठी आणि धक्कादायक असल्याने याबाबत अधिकृत पुष्टी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, अशा संशयामुळे जिल्ह्यातील ड्रग्स नेटवर्कचा व्याप किती मोठा असू शकतो, याचा अंदाज येतो. जर हा संशय खरा ठरला, तर सातारा जिल्हा हा ड्रग्सची साठवण, वाहतूक किंवा वितरणासाठीचा एक मोठा “केंद्रबिंदू” बनल्याची शक्यता निर्माण होईल.

शेड सील; ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या चौकशीतून मोठे धागेदोरे?

पाचुपतेवाडी येथील शेड सील केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या काही व्यक्तींच्या चौकशीतून मोठ्या टोळीचे धागेदोरे बाहेर येण्याची शक्यता आहे. दुर्गम भागातील शेडमध्ये नेमकी कोणती हालचाल सुरु होती, तेथे कोणाची ये-जा होती, कोणत्या मार्गाने वाहतूक होत होती, आर्थिक व्यवहार कोणाच्या माध्यमातून होत होते, याची चौकशी होण्याची शक्यता आहे. कारवाई उशिरापर्यंत सुरु असल्याने तपासात काही महत्त्वाचे मुद्दे, कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक पुरावे, साठा किंवा उपकरणे ताब्यात घेण्यावर भर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

DRIच्या या कारवाईनंतर अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच नेमकी जप्ती, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती, पुढील कारवाई आणि या प्रकरणाचे सातारा जिल्ह्यातील आधीच्या एमडी प्रकरणाशी असलेले संबंध स्पष्ट होतील. मात्र, ड्रग्सविरोधात जिल्ह्यात मोठा ‘सफाया ऑपरेशन’ सुरु असल्याचे संकेत या कारवाईतून निश्चितपणे मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *