किरण खुडे

राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरूनगर एसटी बस स्थानकावर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक यांचा सापडलेला महागडा मोबाईल फोन सुरक्षारक्षक बाळासाहेब थिटे यांनी पोलीसांना माहीती देऊन वाहतूक नियंत्रक कार्यालयात सुपूर्द केला. त्यानंतर वाहतूक नियंत्रक व सुरक्षारक्षक यांनी संबंधीत मोबाईलच्या मालकाचा शोध घेऊन त्यांना तो परत केला. सुरक्षारक्षक थिटे यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शनिवारी सकाळी बसस्थानकावरून नियमीत सेवा बजावत असताना सुरक्षारक्षक बाळासाहेब थिटे यांना फलाट क्रमांक दोन वरील प्रवासी बाकावर वर्दळीच्या ठिकाणी एक मोबाईल फोन पडलेला दिसून आला. त्यांनी इतर प्रवाशांकडे चौकशी केली असता त्यांना त्याबाबत काहीच माहीती मिळाली नाही. त्यांनी संबंधीत मोबाईलवर कुणाचा फोन येत आहे का? याची खूप वेळ वाट पाहिली. त्यानंतर त्यांनी बसस्थानकावरील कर्तव्यास असलेले पोलीस नाईक जीजाबापू बिडकर यांना याविषयी माहिती दिली. व त्यांनतर वाहतूक नियंत्रक सोमनाथ आढळ यांच्याकडे मोबाईल सुपूर्द केला.

दरम्यान, या मोबाईल फोनवर मूळ मालक व सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक धर्मा गणपत बोंबले (रा. वेताळे, ता.खेड) यांचा फोन आला. त्यानंतर त्यांना वाहतूक नियंत्रक कार्यालयात बोलावून घेतले. व मोबाईल फोनची ओळख पटवून तो फोन बोंबले यांच्या ताब्यात दिला. यावेळी वाहतूक नियंत्रक सोमनाथ आढळ, सुरक्षारक्षक एस.डी. उतळे, मनोज मांजरे, एस. एम. मोसे, विजय पवार आदी उपस्थित होते.

प्रवासादरम्यान गाडीची वाट पाहत असताना नकळत विस्मरण झाल्याने मोबाईल फोन विसरल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले होते. बोंबले यांनी याबाबत सुरक्षारक्षक बाळासाहेब थिटे यांचे आभार मानले.

सुरक्षारक्षक बाळासाहेब थिटे यांच्या या कामगीरीबद्दल राजगुरूनगर एसटी आगाराचे वरीष्ठ आगारव्यवस्थापक विद्या कदम, कनिष्ठ आगारव्यवस्थापक उज्वला कुटे, वाहतूक निरीक्षक नासिर हवालदार, सहायक वाहतूक निरीक्षक एम. एफ. सय्यद, स्थानक प्रमुख उत्तम लांडे, कामगार संघटनेचे दत्ता गभाले यांनी कौतूक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *