पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे नगर महामार्गावरील शिरूर शहरातील गॅरेज चालकावर पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत ०१ किलोग्रॅम वजनाचा मेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ सुमारे २,१०,४०,०००/- रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत केला. स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई केली.

नशामुक्त भारत अभियानाची सुरूवात झाल्यानंतर युद्धपातळीवर कारवाया करून भारत देश नशामुक्त करण्याचे अनुषंगाने पुणे ग्रामीण हद्दीत अंमली पदार्थ तसेच तंबाखुजन्य पदार्थाची बेकायदेशीर रित्या विक्री अगर सेवन होवू नये या करीता पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत नवीन वर्षाचे सुरूवातीस अवैध रित्या अंमली पदार्थ व तंबाखुजन्य पदार्थ विनापरवाना जवळ बाळगणारे विक्री करणारे व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आदेशान्वये अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गस्तीवर असताना शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थाची बेकायदेशीर रित्या देवाण-घेवाण होणार असून खात्रीशीर माहिती काढून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश पोलीस अधीक्षक यांनी पथकाला दिले होते. शिरूर शहरातील गॅरेज चालक शादाब रियाज शेख, रा. डंबेनाला, शिरूर ता. शिरूर जि. पुणे हा त्याचे ताब्यातील हिरो होंडा पेंशन मोटार सायकल घेवून बाबुरावर नगर परिसरातील मोकळया मैदानात एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली, त्या माहितीचे अनुषंगाने पथकाने कायदेशीर तरतुदींची पुर्तता करत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग शिरूर यांचे आदेश प्राप्त केले, मिळालेल्या बातमीचे ठिकाणी दि. १८/०१/२०२६ रोजी रात्रौ १२/१० वाजण्याच्या सुमारास पथकाने जावून छापा कारवाई केली. कारवाईत शादाब रियाज शेख, वय ४१ वर्षे यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे ताब्यात १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली पदार्थ व मोटार सायकल असा एकूण २,१०,७०,०००/- रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पो.नि. संदेश केंजळे, स्था.गु.शा. चे सपोनि कुलदीप संकपाळ, सपोनि दत्ताजीराव मोहिते, शिक्रापूर पो स्टे चे श्रेणी पोसई पंडीत मांजरे, पोलीस मुख्यालयाचे पोकों पोपट गायकवाड, स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीण, निलेश शिंदे, राहुल पवार, योगेश नागरगोजे, समाधान नाईकनवरे, भाउसाहेब पुंड, सचिन घाडगे, अजित भुजबळ, आसिफ शेख, अंबादास थोरे, सचिन भोई, यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई शुभम चव्हाण, शिरूर पोलीस स्टेशन हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *