अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी)
बामणोली विभागातील सावरी येथील एमडी ड्रग्स प्रकरणात कोयना जलाशया शेजारी असणाऱ्या हॉटेलमधून आरोपींना जेवण पुरवण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. या अनुषंगाने कोयना धरण व्यवस्थापनाने बामणोली विभागातील बावीस गावातील कोयना जलाशयाच्या संपादित जमिनीवर अतिक्रमण केलेल्या सर्व हॉटेल चालक-मालकांना नोटीसा पाठवल्या होत्या. आठ दिवसात जागा खाली करून देण्यासाठी त्यांना कळवण्यात आले होते. यावर हॉटेल चालकांच्यात खळबळ निर्माण झाली होती. हॉटेल वाचवण्यासाठी या धरणग्रस्त हॉटेल चालक व मालकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे यांना साकडे घातले.
बामणोली जवळील सावरी येथे नुकतीच एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यावर मुंबई क्राईम ब्रँचने धाड टाकली होती. या प्रकरणाचा फटका बामणोली विभागातील बावीस गावातील धरणग्रस्त हॉटेलचालकांना बसला आहे. कोयना जलाशयाला लागून असलेली सर्व हॉटेल ही कोयना धरण व्यवस्थापनाच्या संपादित जमिनीवर व मालकीच्या जागेत आहेत. शासकीय जागेत अतिक्रमण करून अशा हॉटेलमधून बेकायदेशीर कृत्य होत असल्याचा ठपका ठेवत कोयना धरण व्यवस्थापन विभागाने बावीस गावातील सर्व हॉटेल चालकांना नोटीसा पाठवल्या आहेत. याबाबत २२ गाव धरणग्रस्त हॉटेल संघटनेच्या
सर्व हॉटेल मालकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली.
याबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी या हॉटेल चालकांची अडचण लक्षात घेऊन कोयना धरण व्यवस्थापनाचे अधीक्षक अभियंता यांना फोन करून सध्या महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. ही कारवाई आपण थांबवावी, मी संबंधित विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करतो, त्यानंतर मंत्रालय
स्तरावर संबंधित मंत्री व कोयना धरण व्यवस्थापन व हॉटेल चालक-मालक यांची संयुक्त मीटिंग घेऊन मार्ग काढण्यात येईल. एक तर हे धरणग्रस्त असून त्यांना उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. संपादित केलेली जमीन भाडेतत्त्वावर या हॉटेल चालकांना देण्याबाबत मंत्रालयीन स्तरावर निर्णय घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी या हॉटेल चालकांना दिले.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या शिष्टाईमुळे कारवाईला तूर्तास पूर्णविराम मिळाला असल्याने बावीस गावातील धरणग्रस्त हॉटेल चालक मालकांनी बाबाराजे यांचे आभार मानले आहेत. यावेळी बावीस गाव धरणग्रस्त हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र संकपाळ, किसन भोसले, धनाजी संकपाळ, गोविंद शिंदकर, आनंद पवार, गणेश भोसले, किसन भोसले, राजेंद्र कांबळे, सचिन पवार आदी व धरणग्रस्त हॉटेल चालक-मालक उपस्थित होते.
