अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी).जुना आरटीओ चौक ते वाढेफाटा मार्गावर भिक्षेकरीगृहासमोर शुक्रवारी (दि. ९ रोजी) रात्री साडेआठच्या सुमारास – टेम्पो आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. प्रमोद परशराम जाधव (रा. आरेदरे, ता. सातारा) असे मृताचे नाव असून, ते सुरक्षा दलात जवान होते.
पोलिसांकडून घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाढे फाटा येथून दुचाकीवरून प्रमोद परशराम जाधव हे साताराकडे निघाले होते. भिक्षेकरीगृहाजवळ समोरून येणाऱ्या टेम्पोला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. धडकेनंतर ते फेकले जाऊन पाठीमागील दुचाकीवर आदळले. अपघातात डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुसऱ्या दुचाकीवरील दोघे युवकही जखमी झाले. घटनेनंतर गर्दी झाली. अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. मृत प्रमोद जाधव हे सैन्यात असून, लडाख येथे सेवा बजावत होते. वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टी घेऊन ते नुकतेच गावी आले होते. प्रमोद जाधव यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
