किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा वाफगाव ( ता.खेड ) या त्यांच्या जन्मगावी होळकर किल्ल्यात उत्साहात साजरा झाला. मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणूक, राजराजेश्वर मंदिरात अभिषेक, वाफगाव ग्रामस्थांच्या हस्ते गडपूजन व ध्वजारोहण, मर्दानी खेळ, होळकर परिवार व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते राज्याभिषेक, राजघराण्यांचे वंशज व राज्याभिषेक समिती सदस्य यांच्या हस्ते तळीभंडार, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन आदी कार्यक्रम यावेळी पार पडले.या कार्यक्रमाला देशभरातून आलेले राजघराण्यांचे वंशज व होळकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी आलेल्या समस्त भारतवासीयांना मार्गदर्शन केले.महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन हा लोकोत्सव करायचा आहे. यशवंतरावांनी राष्ट्र प्रथम ठेऊन मराठा ,वंजारी ,मुस्लिम व अठरा पगड जातीच्या लोकांना सैन्यात घेऊन इंग्रजांच्या विरुद्ध युद्धे लढली व देशाची सेवा केली. नेपोलियनच्याही पुढे जाऊन त्यांनी इंग्रजांना पराभूत केले. पेशव्यांनी सुभेदारी नाकारल्यावर त्यांनी ६ जानेवारी १७९९ ला स्वतःच्या हिंमतीवर राज्यभिषेक केला. उपेक्षित व वंचितांचे महाराजा यशवंतराव प्रेरणास्थान होते.अशा या पराक्रमी देशभक्त राजाचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तु पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आज २५० वर्षांनंतर संवर्धित होत आहे. संवर्धनाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे.

किल्लाच्या संवर्धनासाठी पहिल्या टप्प्यातील ७ कोटी २० लाख रुपयांच्या निधीतुन होणारे काम प्रगतिपथावर असून पुढील कामासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे किल्ल्याच्या वैभवात भर पडली आहे.या कामासाठी जेष्ठ नेते शरद पवार व पालकमंत्री अजित पवार यांची मोठी मदत झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील सहकार्य मिळत असल्याचे भूषणसिंहराजे होळकर यांनी सांगितले.

वाफगाव ग्रामस्थांचे किल्ल्यावर व होळकर घराण्यावर खूप प्रेम असल्याचे सांगून किल्ल्याचे संवर्धन झाल्यास या परिसरात पर्यटन वाढेल, रस्ते, पाणी असे अनेक प्रश्न मार्गी लागतील, परिसराचा विकास होईल, ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. येथील शाळा देखील अद्ययावत करायची असून या परिसराच्या रचनात्मक कामासाठी सर्वांनी पुढे यावे हा परिसर लवकच पर्यटनक्षेत्र म्हणून पुढे येणार असल्याने माजी आमदार दिलिप मोहिते यांच्या प्रयत्नातुन २४० कोटी रुपये वाफगाव रस्त्यांच्या कामासाठी मिळाले आहेत, असे होळकर यांनी सांगितले.

राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. जगभरात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीजं लढवय्या मनात पेरली. राजस्थान, माळवा, पंजाब, दिल्ली इतक्या भल्या मोठ्या प्रदेशात महाराजांनी इंग्रजांविरुद्ध युद्धे लढली. भारतमातेच्या रक्षणासाठी आपसातील मतभेद विसरुन देशभरातील सर्व राजा महाराजांना एकत्र येण्याचे आवाहन केले. महाराजांना बिनशर्त संधी करण्याची इंग्रजांची मानसिकता होती. मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता. लवकरच महाराजा यशवंतराव होळकर यांचा सिंहासनाधीष्ट अष्टधातूचा पुतळा आपल्या सर्वांच्या मदतीतून वाफगाव येथील राजसदरात बसवायचा असल्याची घोषणा भुषणसिंहराजे होळकर यांनी केली. यावर उपस्थितांनी घोषणा व टाळ्या वाजवून दाद दिली.

सोहळ्यास कवठेमहाकाळचे आमदार जयसिंग शेंगडे, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार रमेश शेंडगे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके ,भाजपचे राज्य सरचिटणीस नवनाथ पडळकर, महालींगराज महाराज, माजी मंत्री बाळासाहेब दोलतोडे, धनगर महासंघाच्या सुषमा पुजारी, चंद्रकांत वाघमोडे, भगवान जऱ्हाड, योगेशराजे होळकर, दिपक बोराटे, धनंजय भागवत, अशोक थिटे यांच्यासह अमरावती, जालना, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, कर्जत, जामखेड, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर येथून व राज्यातून आलेले होळकर प्रेमी समाजबांधव व भगिनी, भारतीय लष्करातील काही ज्येष्ठ अधिकारी व संपूर्ण देशातून अनेक ऐतिहासिक राजे व सरदार घराण्यांचे वंशज, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, संघटनांचे पदाधिकारी, यशवंत सेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रा.ज्ञानदेव बुरुंगले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *