पुणे (हवेलीनामा वृतसमूह)

संत तुकाराम शिक्षण संस्था संचलित वाडेबोल्हाई येथील अनुसया तुकाराम पठारे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केसनंद येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शैक्षणिक भेट देऊन बँकेच्या दैनंदिन कामकाजाची ओळख करून घेतली.या भेटीत महाविद्यालयाचे २७ विद्यार्थी व ५ प्राध्यापक सहभागी झाले होते.

या शैक्षणिक भेटीदरम्यान बँकेचे व्यवस्थापक तुळशीराम गोते यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राची सविस्तर व सखोल माहिती दिली. यामध्ये बचत खाते उघडण्याची प्रक्रिया, खाते व्यवस्थापन, पैसे हस्तांतरण करण्याच्या विविध पद्धती—रोख व्यवहार, धनादेश, UPI, NEFT, RTGS तसेच ऑनलाईन बँकिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी बँक राबवत असलेल्या विविध बचत योजना, कर्ज योजना, शासकीय योजना व डिजिटल बँकिंग सुविधांची माहिती देण्यात आली.

या उपक्रमासाठी बँकेचे रोखपाल प्रीतम कुंभार व लेखनिक कु. पूजा शिंदे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. त्यामुळे प्रश्नोत्तर सत्र विशेष प्रभावी ठरले.

ही शैक्षणिक भेट यशस्वी केल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उमा काळे यांनी बँकेचे व्यवस्थापक गोते यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तिका भेट देऊन सत्कार केला.

याचे आयोजन संत तुकाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पठारे ,सहसचिव ऍड दत्तात्रय काळे, संस्थेचे कार्यवाहक, आप्पासाहेब पठारे, जोगेश्वरी माता विद्यालयाचे प्राचार्य प्रा. सतीश धुमाळ,प्रा. पल्लवी गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले होते. नियोजन समन्वयक प्रा. ऋषिकेश इथापे व प्रा. कोमल गायकवाड यांनी केले होते. तर प्रा. महेंद्र चित्ते, प्रा. सोनाली उनउने व प्रा. शरद सवाईसर्जे यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.

यावेळी विद्यार्थी मच्छिंद्र गडदे व काजल सावंत यांनी मनोगत व्यक्त करत, या भेटीतून त्यांना बँकिंग व्यवहारांबाबत अत्यंत उपयुक्त व व्यवहार्य माहिती मिळाल्याबद्दल बँक प्रशासन व महाविद्यालयाचे आभार मानले.

आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता अत्यंत आवश्यक असून, अशा प्रकारच्या शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जागरूकता, शिस्त व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *