लोणीकाळभोर (हवेलीनामा वृतसमूह) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात मराठी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले.त्याला १९४ वर्ष पूर्ण झाली. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून आज महाविद्यालयात ‘मराठी पत्रकार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रभातचे पत्रकार राजेंद्र काळभोर अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाले की, ” बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र सुरु केले त्याचा मुख्य उद्देश समजपरिवर्तन व लोकशिक्षणासाठी होते. वृत्तपत्र लोकशाहीचा चौथा खांब आहे.आज निर्भीड आणि सत्य शोधन याबरोबरच दुर्लक्षित समाजाकडून न्यायाची भूमिका घ्यावी लागेल. प्रलोभनास बळी न पडता समाजाच्या वास्तव प्रश्नास प्राधान्य देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले. ” तसेच या प्रसंगी दिगंबर जोगदंड म्हणाले की, ” बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या २० व्या वर्षी “दर्पण” नावाचे वृत्तपत्र सुरू केले. एक शिक्षक समाज सुधारक पत्रकार संपादक अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या ब्रिटिश कालखंडात सुरू केलेले हे वृत्तपत्र दोन स्तंभामध्ये लेखन केले जात होते एक इंग्रजी व दुसरे मराठी इंग्रजांना येथील लोकांच्या व्यथा आणि समस्या कळाव्यात यासाठी त्यांनी इंग्रजीतून आपले दुःख मांडले. समाज परिवर्तन आणि सत्यशोधन हाच पत्रकारितेचा गाभा आहे यावर बाळशास्त्री जांभेकरांचा विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी लोक रुढी परंपरा यावर प्रहार करीत जनसामान्यांच्या लोकशिक्षणाला प्राधान्य दिल्याचे समजते असे प्रतिपादन केले. ”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर म्हणाले की, ” वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा खांब आहे. ब्रिटिश राजवटीत समाज जागृत करून समाजाला लोकशिक्षण देण्याचे कार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो प्रिंट मीडियापासून ते सोशल मीडिया पर्यंत झालेला हा आधुनिक पत्रकारितेचा प्रवास जाणून घेताना आजही प्रिंट मीडियाचे महत्त्व किती आहे हे लक्षात येते. फेक न्यूजच्या जमान्यात प्रिंट मीडियाचे वास्तव आजही अधोरेखित होताना दिसते. आजच्या पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून बाळशास्त्री जांभेकरांच्याच विचाराने चालणाऱ्या आधुनिक वृत्तपत्र आणि त्यांचे पत्रकार यांचा सन्मान व्हावा यासाठीच आज हा विशेष सन्मान सोहळा आयोजित केला आहे असे प्रतिपादन केले. ”
महाविद्यालयातील विशेष सन्मान सोहळ्यासाठी राजेंद्र काळभोर, सिताराम लांडगे, दिगंबर जोगदंड, महेश फलटणकर,पंढरीनाथ नामुगडे,सुनील थोरात, बापू चौधरी,गणेश धुमाळ,तुळशीराम घुसाळकर आदी पत्रकार बंधू उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार डॉ. स्नेहा बुरगुल यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले.
