अतुल देशपांडे यांजकडून,

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी,सातारा, (हवेलीनामा प्रतिनिधी) “जागतिक दर्जा, भारतीय साहित्य आणि मराठीमधील चांगले साहित्य अशा तीन पातळीवरील वाचन जाणीवपूर्वक करायला हवे. वाचनाचा परीघ वाढवणे आवश्यक आहे; जे खोलवर रुजते त्यातून आलेल्या अनुभुतीतून झालेले लिखाण वाचकांना भावते. वरवरचे लेखन फार काळ टिकत नाही’, असे मार्गदर्शन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. संगीता बर्वे, बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी ‘संवाद बालकुमार वाचकांशी’ या विषयावरील संवादात्मक कार्यक्रमात केले.

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालकुमार वाचन कट्ट्यावर आज (दि.३) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या बालिकादिनाचे निमित्त साधून समस्त स्त्रीवर्गाला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. साताऱ्यातील विविध शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांशी डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे यांनी मनमोकळा संवाद साधला.

राजीव तांबे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामिल होत त्यांच्याशी संवाद साधला. पावसाचे ढग काळे का, कपाटाचे की होल हॅण्डलच्या खाली का, इस्त्री त्रिकोणी का असे गंमतशीर प्रश्न विचारत गणित, विज्ञान आणि पर्यावरण या विषयांची भीती न बाळगता ते हसत खेळत शिकण्याची झलक दाखवली.

“प्रत्येक वेळी वेगळा विचार करून जगण्याची पद्धत सोपी करणे हे अनेक शास्त्रज्ञांचे वैशिष्ट्य आहे. जो रस्ता नीट ओलांडू शकतो तो गणितात हुशार. चूक म्हणजे वेगळा विचार करण्याची, शिकण्याची नवीन संधी. ज्यामुळे काय योग्य केले पाहिजे हे समजते. त्यामुळे चुकांना अजिबात घाबरायचे नाही,’ अशा शब्दात राजीव तांबे यांनी विद्यार्थ्यांचा हुरूप वाढविला.

विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करीत तांबे म्हणाले, मुलांच्या विचारशक्तीला चालना देत गंमतशीर पद्धतीने शिक्षण द्यायला हवे. स्मरणशक्ती ऐवजी अकलनावर प्रश्न असावा. मुलांना ज्याचे आकलन होत आहे ते त्यांना त्यांच्याच भाषेत मांडू द्यावे. दिव्यांग मुलांसाठी अजून लिहिलेले नाही याची खंत आहे. या मुलांसाठी काहीतरी करायचे आहे, असेही ते म्हणाले.

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘पियूची वही’ या पुस्तकाचा प्रवास उलगडताना डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, पुस्तकनिर्मिती ही प्रक्रिया दीर्घकालीन असते. माझे वडील चित्रकार होते. त्यांच्यासोबत देऊळ रंगवण्याचे काम मी केले आहे. त्यावेळी त्यांच्याबरोबर नदीच्या पात्रातून जावे लागत होते. त्यांनी मोठी मंदिरे रंगविली तर मी छोटी मंदिरे रंगविली अशी अनेक वर्णने पियूच्या वहीत आहेत.

कविता कशी सुचते याविषयी बर्वे म्हणाल्या, आमच्याकडे येणारी दुधाची पिशवी दूधवाला जमिनीवर ठेवून जात असे. दुधाच्या मोहापोटी एक मांजर ती पिशवी फाडून टाकत असे. या वरूनच मला ‘एक मांजर गाते सुंदर, वाजवते ती व्हायोलिन…’ ही कविता सुचली. आजची मुले खूप छान छान लिहितात. रोज नवीन पाच शब्द शिकलो तरी आपली भाषा समृद्ध होते. साहित्य संमेलने हीच प्रेरणा देतात. खूप वाचन केल्यास लेखनही छान होते. आई वडील हे माझे प्रथम प्रेरणास्थान आहेत. अनेक वर्षांची मनात नोंदविलेल्या निरीक्षणातून कधी कविता तर कथा निर्माण होते. यावेळी संगीत बर्वे यांनी ‘आभाळात ढगांची लांबलचक झुकझुक गाडी…’ ही बाल कविता मुलांकडून साभिनय म्हणून गेतली. तर ‘भाषेमुळे घडतो आपण, भाषा आपण घडवावी’, ‘चला चला रे वाचू आपण पुस्तक’ या कविता ऐकविल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *