दिपक खिलारे,
इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी)
खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व मुक्ताई ब्लड सेंटर, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार (दि.३) रोजी महाविद्यालयाच्या परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ८५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून इंदापूर येथील हृदय रोग तज्ज्ञ डॉ. रोहन हेगडे, मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूरचे चेअरमन अविनाश ननवरे, इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. ज्योती जगताप, विद्या प्रतिष्ठान कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण संगिकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हृदय रोग तज्ज्ञ डॉ. रोहन हेगडे यांनी आपल्या भाषणात रक्तदानाचे आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व विशद केले. नियमित रक्तदानामुळे अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचतात तसेच रक्तदान करणाऱ्याच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले. युवकांनी रक्तदानाला सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व सेवाभाव निर्माण करणे हीच खरी शिक्षणाची उद्दिष्टे आहेत. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये मानवतेची जाणीव निर्माण होते. महाविद्यालय समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयातील एनएसएस समन्वयक प्रा. संतोष देवकाते यांनी केले. त्यांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत युवकांनी अशा उपक्रमांत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सचिन पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व एनएसएस स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली.
