पुणे (हवेलीनामा वृतसमूह) आरोग्य विभागाच्या उपनसंचालकासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवकावर ३ लाखाची लाच मागणी व स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून ताब्यात घेतले. आणि बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, रामकिसन गंगाधर घ्यार वय 43 वर्ष, पद आरोग्य सेवक जिल्हा परिषद पुणे. रा ठी. सरकारी निवासस्थान क्र 1. आरोग्य केंद्र वाघोली, तालुका हवेली जिल्हा पुणे. (वर्ग-3) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोग्य सेवकाचे नाव आहे.

थोडक्यात माहिती अशी की,तक्रारदार हे एक आरोग्य सेवक असून त्यांची जून 2025 मध्ये उपसंचालक कार्यालय कोल्हापूर मंडळ ते उपसंचालक कार्यालय पुणे मंडळ अशी अंतर मंडळ बदली झाली आहे. परंतु जून 2025 पासून आज पर्यंत त्यांना पुणे मंडळात पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी पोस्टिंग दिली नसून उपसंचालक कार्यालयातच आरोग्य सेवक पद नसतानाही ठेवून घेतले आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे रिक्त असलेल्या आरोग्य सेवकाच्या पदावर नेमणूक होण्यासाठी बदलीचा विनंती अर्ज केला होता. यातील आरोपी पुणे जिल्हा परिषदेच्या अखतारीत आरोग्य सेवक म्हणून नोकरीस असून ते उपसंचालक डॉक्टर श्री भगवान पवार यांच्या रोजच्या संपर्कातील आहेत.तक्रारदार हे त्यांच्या बदलीच्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने उपसंचालक आरोग्य, पुणे मंडळ डॉ. भगवान पवार यांना भेटले असता त्यांनी तक्रारदारास यातील आरोपी रामकिशन घ्यार याना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार हे यातील आरोपीस भेटले असता त्याने तक्रारदाराने मागितलेल्या ठिकाणी बदली करण्यासाठी डॉ. भगवान पवार यांच्यासाठी 3 लाख द्यावे लागतील असे सांगून तीन लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली असल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी डिसेंबर मध्ये पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग येथे दिली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता, लोकसेवक रामकिशन घ्यार यांनी तक्रारदार यांचे बदलीच्या कामासाठी तक्रारदाराकडे डॉ. भगवान पवार, उपसंचालक आरोग्य विभाग, पुणे, यांचे करीता 3,00,000/- रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दिनांक 2 फेब्रुवारी,2026 रोजी रामकिशन घ्यार यांनी तक्रारदार यांच्याकडे तक्रारदाराच्या वरील प्रमाणे बदलीच्या कामाकरता पडताळणीमध्ये डॉ भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य विभाग, पुणे यांच्यासाठी मागणी केलेले 3,00,000/- रुपये लाच रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार दिनांक 04/12/2025 व 05/12/2025 रोजी लोकसेवक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
