अतुल देशपांडे यांजकडून,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा.ग.तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे देण्यात येणारा चिरमुले पुरस्कार “नाम फाउंडेशन” यांना श्री नाना पाटेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार संस्थेच्या वतीने श्री. नाना पाटेकर यांनी त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रुपये एक लाख व सन्मान चिन्ह असे आहे.
नाम फाउंडेशन ही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या मराठी सिनेअभिनेत्यांनी सामाजिक जाणिवेतून सुरू केलेली संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना सप्टेंबर २०१५ मध्ये झाली. ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत व त्यांना पुनः उभे राहाण्यास करते. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे, यासाठीसुद्धा ही संस्था कार्यरत आहे. ही संस्था शेतकऱ्यांच्या समस्यांचे निर्मूलन करून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला सशक्त बनवते. वंचित गावांमध्ये विकास आणि अशा लोकांच्या जीवनात आनंद आणण्याच्या त्यांच्या १० वर्षाच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन २०२४ चा ‘चिरमुले पुरस्कार’ सदर संस्थेस देऊन गौरविण्यात आले.
चिरमुले ट्रस्टने यापूर्वी डॉ.कै.मनमोहन सिंग,डॉ.श्री.विजय भटकर,डॉ.अनिल काकोडकर, कै.रतन टाटा, कै.राहुल बजाज, डॉ.सी.रंगराजन,श्री.गुलजार, डॉ.सायरस पूनावाला, डॉ.राजेंद्रसिंह, डॉ. हिम्मतराव बावस्कर आदि आदरणीय व्यक्तिना या पुरस्काराने गौरविले आहे.
पुरस्कार प्रदान करतेवेळी ट्रस्टचे विश्वस्त – श्री.दिलीप पाठक, डॉ.अनिल पाटील, डॉ.अच्युत गोडबोले, श्री. समीर जोशी तसेच आयडीबीआय ट्रस्टी तर्फे सौ मानसी माचवे व सौ मानसी पतकी व नाम फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेश थोरात इतर मान्यवर उपस्थित होते.
