अतुल देशपांडे,

 

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) .महाबळेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिर मुरा ता.महाबळेश्वर येथे बांधकाम कामगार राहत असलेले कंटेनरमध्ये पेटलेला कोळसा घमेले मध्ये घेऊन पायाखाली ठेवून झोपी गेले होते ते सकाळी बेशुद्ध अवस्थेत मिळाले म्हणून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत झाल्याचे सांगितले.

१. मतिऊर रहमान वय ५३ रा. सिस्वा बिहार.

२. विपिन तिवारी वय ५५ राहणार गोपालगंज बिहार.

अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे

महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा जवळील अहिर वाणवली येथे कोळसा पेटवून त्याच्या उबदार हवेत थंडीपासून बचाव करण्याच्या प्रक्रियेदरम्यान विषारी धुरामुळे श्वास गुदमरून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अहिर मुरा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या धुरामध्ये असलेल्या विषारी वायूचा प्रभाव वाढल्याने या दोघांनाही श्वास घेण्यास प्रचंड त्रास झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. कोळसा शेगडीतून बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्साईड हा वायू अत्यंत जीवघेणा ठरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे आणि या घटनेमागे काही घातपात किंवा अन्य तांत्रिक कारण आहे का, याची पडताळणी करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळावरील नमुने गोळा केले जात असून, पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.दुर्गम भागात कोळसा व्यवसायात सुरक्षिततेची पुरेशी साधने नसल्याने अशा दुर्घटना वारंवार समोर येत आहेत. या घटनेमुळे मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *