किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : कडुस (ता. खेड) येथील मुक्ताईमाळ परिसरातील विटभट्टी व ऊसतोड कामगारांना माऊली सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मोफत कपड्यांचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
राजगुरूनगर परिसरातील नागरिकांकडून लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचे जुने, परंतु वापरण्यायोग्य कपडे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संकलित करण्यात येतात. संकलित कपड्यांची योग्य प्रकारे छाननी व विभागणी करून ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी हे कपडे वाटप केले जातात. या सामाजिक उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळत आहे.
गेल्या एक महिन्यात प्रतिष्ठानकडे जमा झालेल्या तब्बल २६ पोती कपड्यांचे वाटप खेड तालुक्यातील कडुस जवळील विटभट्टी व ऊसतोड कामगारांना करण्यात आले. थंडी व कामाच्या कठीण परिस्थितीत हे उबदार कपडे कामगारांसाठी उपयोगी ठरणार आहेत.
कपडे मिळाल्यानंतर कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. “कोणीतरी आमची काळजी घेत आहे” ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होती.
या उपक्रमाचे संयोजन माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, सचिव छाया दुधाळे यांच्यासह वासुदेव गोपाळे, सचिन शिंदे, दिपाली शिंदे, हर्षल शिंदे, वृंदावन महाजन, बाबाजी कातोरे, सविता लोंढे, गौरी दुधाळे यांनी केले.
माऊली सेवा प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
